आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला वाचवताना आईचाही खदानीच्या पाण्यात बुडून मृत्यू, भोकरदनमधील हृदयद्रावक घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना/भोकरदन/सोयगावदेवी - खदानीवर धुणे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नऊवर्षीय मुलगी पाय घसरून पाण्यात पडल्याने तिला वाचवण्यासाठी आईनेही पाण्यात उडी घेतली. मात्र पोहता येत नसल्याने दोघीही बुडाल्या. ही हृदयद्रावक घटना भोकरदन तालुक्यातील कुंभारी शिवारातील खदानीत शनिवारी दुपारी ३ वाजता घडली. कमलाबाई रामचंद्र पवार (३५) व भारती रामचंद्र पवार (९, दोघी रा. भिवगाव, ता. देऊळगावराजा,  जि. बुलडाणा, ह.मु. निमगाव, ता. भोकरदन) अशी मृत मायलेकींची नावे आहेत.    
 
गेल्या पाच-सहा वर्षांपासून कामानिमित्त भिवगाव येथून आलेल्या कमलाबाई पवार ह्या आपल्या कुटुंबीयांसह निमगाव येथे राहत होत्या.  कुंभारी येथील स्टोन क्रशरवर त्या कामाला होत्या.  शनिवारी दुपारपर्यंत काम केल्यावर त्या मुलगी भारती व आरती यांना सोबत घेऊन धुणे धुण्यासाठी जवळच असलेल्या खदानीवर गेल्या.  या वेळी अचानक भारतीचा पाय घसरून ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी कमलाबाईनेही पाण्यात उडी मारली. मात्र, खदानीत जवळपास १२ ते १५ फूट खोल पाणी असल्यामुळे दोघीही बुडाल्या. या वेळी काठावर उभी असलेली छोटी मुलगी आरती हिने आरडाओरड करत लोकांना बोलावले.  पोहता येत असलेल्या लोकांनी पाण्यात उडी मारून कमलाबाई व भारती यांना  पाण्यातून वर काढून त्वरित भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात नेले.  मात्र तोपर्यंत दोघींचा मृत्यू झाला होता.   सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती.  

उघडी खदान, मृत्यूला निमंत्रण: खदानीतून दगड काढून झाल्यावर ती खदान बुजवणे गरजेचे असते. मात्र, असे न झाल्यामुळे कुंभारझरी येथील खदान तशीच उघडीच राहिली व त्यात पाणी साचले. यामुळे धुणी धुण्यासह इतर कामासाठी हे पाणी वापरले जाऊ लागले. यातच शनिवारी धुणे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा मृत्यू झाला.

स्थलांतरित ५०-६० लाेकांची वस्ती   
गावाकडे काम नाही, शेतीवाडी नाही. त्यामुळे  मिळेल ते काम आणि काम मिळेल ते आपले गाव अशी पवार कुटुंबाची अवस्था आहे. दरम्यान, भिवगाव येथून आलेल्या ५०-६० लोकांची छोटीशी वस्ती गेल्या ५-६ वर्षांपासून निमगाव येथे तयार झाली आहे. केवळ निवडक सण-उत्सव व मतदानासाठीच ते गावाकडे जातात. दरम्यान, गावाकडे सलग काम मिळत नसल्यामुळे स्टोन क्रशरवर कामाला आल्याचे एकाने सांगितले.   
 
बातम्या आणखी आहेत...