आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँकेच्या सुरक्षा रक्षकांनी घातला लाखाला गंडा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकाच्या एटीएम कार्डाची अदलाबदल करून बँकेच्याच तीन सुरक्षा रक्षकांनी 15 दिवसांपूर्वी सव्वालाखाला गंडा घातला. या आरोपावरून बँकेच्या तीन सुरक्षा रक्षकांवर गुरुवारी बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

शंकर शाहुराव गालफाडे (पूरग्रस्त कॉलनी, खंडेश्वरीनगर) 4 जून रोजी सायंकाळी जालना रोडवरील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये गेले. तिथे एटीएमचे सुरक्षा रक्षक गणेश यलमकर यांना एटीएममधून पैसे काढून देण्याची विनंती गालफाडे यांनी केली. यलमकरने गालफाडेंना पैसे काढून दिले. मात्र, स्वत:जवळील दुसरेच एटीएम कार्ड गालफाडे यांना देत तुमचे पैसे निघाले आता तुम्ही जा, असे म्हणत कार्ड लपवून ठेवले.

तिघांवर गुन्हा
गालफाडे जाताच यलमकरसह आणखी दोन सुरक्षा रक्षकांनी बीडसह औरंगाबाद, जयपूर येथील एटीएमवरून गालफाडे यांच्या कार्डद्वारे जवळपास एक लाख 18 हजार रुपयांची रक्कम काढली, अशी तक्रार गालफाडे यांनी बीड शहर ठाण्यात दिली. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल झाला.

स्वत:च काळजी घ्यावी
पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. शहर पोलिस दुसर्‍या बाजूनेही तपास करत आहेत. यापूर्वीही या एटीएममध्ये असे प्रकार झाले आहेत. एटीएममध्ये पैसे काढताना अनोळखी व्यक्तीस एटीएम कार्ड व गोपनीय कोड देऊ नये, आपल्या व्यवहारांबाबत कुणालाही माहिती देऊ नये तसेच गैरप्रकार घडू नयेत, यासाठी स्वत:च काळजी घ्यावी, असे आवाहन बँकेने केले आहे.
फुटेज पोलिसांना दिले
या प्रकारानंतर एसबीआयने त्या दिवशीचे सिसिटीव्ही फुटेज शहर पोलिसांना दिले आहे. या फुटेजमध्ये बँकेचा सुरक्षा रक्षक बाहेर निघून गेलेला दिसत असून एटीएममध्ये अनोळखी लोक दिसून येत आहेत.

सजग राहा
बँकेचे खातेदार शंकर गालफाडे यांनी सुरक्षा रक्षक समजून दुसर्‍याच अनोळखी व्यक्तीला एटीएम कार्ड व गोपनीय कोड दिला. अनोळखी व्यक्तीने त्यांच्या खात्यातून पैसे लांबवले. एटीएमद्वारे पैसे काढताना काळजी न घेतल्यामुळे हा प्रकार घडला. असे प्रकार घडू नयेत, यासाठी ग्राहकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.’’
प्रशांत केसकर, मुख्यप्रबंधक, एसबीआय