आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापुरात रोजगार हमी योजनेत घोटाळा; ग्रामस्थांचे उपोषण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर- तालुक्यातील टाकळी सागज येथे रोजगार हमी योजनेतील रोपवाटिकेच्या कामात बोगस मजूर उपस्थितीच्या नावाखाली आर्थिक निधी हडप करणा-या महिला ग्रामसेविकेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी उपसरपंच श्रीकृष्ण कराळे यांच्यासह पंधरा जणांनी सोमवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

2011 - 12 या वर्षात टाकळी सागज येथील गट नंबर 77 मध्ये रोजगार हमी योजनेतून 1 लाख 75 हजार रुपये खर्चाच्या रोपवाटिकेच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. दरम्यान, रोपवाटिकेच्या कामात महिला ग्रामसेविका सुरेखा आहिरे यांनी कामावरील मजुरांच्या हजेरीपुस्तिकेत बोगस
मजुरांची उपस्थिती दाखवून निधी हडप केला. तसेच रोपवाटिकेसाठी पंचायत समितीकडून प्लास्टिक पिशव्या खरेदीसाठी मिळालेली 9 हजारांची रक्कम त्यांनी कामासाठी वापरली नसल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
चौकशी झाली पण कारवाई नाही
ग्रामसेवक सुरेखा आहिरे यांनी निधी लाटला असल्याची तक्रार उपसरपंच श्रीकृष्ण कराळे यांनी गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांच्याकडे केली होती. त्यानुसार विस्तार अधिकार्‍यांनी रोपवाटिकेच्या कामाची व कागदपत्रांची तपासणी केली असता ग्रामसेविका आहिरे यांनी हजेरीपत्रक 56716 व 56717 मध्ये बोगस मजूर उपस्थिती दाखवून 15 हजार 822 रुपये परस्पर उचलल्याचे आढळून आले. त्याचा अहवाल गटविकास अधिकार्‍यांकडे दाखल करण्यात आला आहे.

उपसभापतींच्या गावात घोटाळा
पंचायत समिती उपसभापती द्वारका पवार यांचे गाव असलेल्या टाकळी सागज गावात रोजगार हमी योजनेच्या कामात आर्थिक घोटाळा झाला असल्याची चर्चा दिवसभर पंचायत समिती कार्यालयात रंगली होती. विशेष म्हणजे त्यांचे पतीच या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत.