आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दप्तराविना शाळा उपक्रमाचा उडाला फज्जा; विद्यार्थी, पालक अनभिज्ञ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- "सर्वांनाच' आपले वाटणारे आदरणीय (दिवंगत) डॉ. एपीजे अब्दुल कलाम सर, आम्हाला माफ करा! तुमची पहिलीवहिली जयंती मुलांसाठी ‘दप्तराविना शाळा’ व ‘वाचन प्रेरणा' दिवस म्हणून साजरी करण्याचे दस्तुरखुद्द शिक्षणमंत्र्यांनी ठरवलेले होते. शिक्षण संचालकांचेही त्याबाबतचे आदेश धडकले. मात्र, इतर उपक्रमांसारखीच याचीही अंमलबजावणी अनेक ठिकाणी झाली नाही. केवळ "आम्हाला तसे पत्र मिळाले नाही' या सबबीखाली उपक्रम तितकासा गंभीरतेने राबवला नाही. परिणामी, मुले रोजच्या प्रमाणेच दप्तराचे ओझे वाहतच गुरुवारी शाळेत आली होती.

दिवसेंदिवस वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये असे पूरक किंवा अवांतर वाचन होत नाही. त्यांच्या नियमित अभ्यासक्रमामुळे दप्तराचे ओझे अधिक झाले आहे. रोजच्या वेगवेगळ्या खासगी शिकवण्यांमुळे अशा धावपळीत विद्यार्थी बौद्धिकता वाढवणारे अवांतर वाचन विसरून गेले. याचा विचार करून विद्यार्थ्यांमध्ये पूरक वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वाचन संस्कृती त्यांच्यात रुजावी, या हेतूने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यंदा दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यात दप्तराच्या ओेझ्याचाही मुद्दा ऐरणीवर असल्यामुळे या दिवशी (१५ ऑक्टोबर) "दप्तराविना शाळा' हा उपक्रम राबवण्याचा निर्णयही तावडे यांनी जाहीर केला. १५ ऑक्टोबरला परिपत्रकानुसार तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त नामवंत साहित्यिकांच्या कथा-कवितांची पुस्तके शाळेत वाचावीत. पुस्तक पेढी तयार करावी अादी उपक्रम राबवण्याचे कळवले होते. तसे काही शाळांमध्ये घडलेही; पण विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे काही उतरलेले नव्हते. यासंदर्भात कोणतेही पत्र शिक्षण विभागाने दिले नसल्याचे शाळांकडून सांगण्यात आले. शिक्षणमंत्र्यांचे आदेश शिक्षण विभागाने फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचेच दिसून आले. त्यामुळे दिवंगत डॉ. एपीजे कलाम सर आम्हाला माफ करा, असाच सूर शिक्षणप्रेमींकडून उमटला.

मुख्याध्यापकांनी दक्ष असावे
वाचन प्रेरणा दिवस व दप्तराविना शाळा' या उपक्रमासंदर्भात माध्यमांमधून जागृती करण्यात आली होती. गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्रही पाठवले होते. शासनाचा अध्यादेश असून मुख्याध्यापकांनी पत्राची वाट न पाहता स्वप्रेरणेने उपक्रम राबवले पाहिजेत. यासाठी मुख्याध्यापकांनी स्वत: दक्ष राहिले पाहिजे.''
-शशिकांत हिंगोणेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

पूर्वकल्पना देणे अपेक्षित
दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थी पाठदुखीच्या आजाराला बळी पडत आहे. त्यामुळे दप्तराविना शाळा हा उपक्रम उपयुक्त असून ते या दिवशी शाळेचा मनसोक्त आनंद लुटतील. उपक्रमाबद्दल शाळेने त्यांना सूचना देणे अपेक्षित आहे. रोजच्याप्रमाणेच विद्यार्थ्यांना दप्तरासह पाठवले.''
-वंदना शिवशंकर मिटकरी, पालक

शाळेने सांगितलेच नाही
डॉ. कलाम जयंतीनिमित्त १५ रोजी वाचन प्रेरणा दिवस घेण्यात येणार असल्याची सूचना शाळेने दिले होती. मात्र, या दिवशी दप्तर अाणू नये, असे सांगितले नव्हते. रोजच्याप्रमाणे दप्तर आणले.''
-प्रांजली कुलकर्णी, विद्यार्थिनी

सूचनेची वाट बघितली नाही
वाचन प्रेरणा दिन हा दप्तराविना साजरा करण्याची सूचना एक दिवस आधीच विद्यार्थ्यांना दिली होती. यासंदर्भात शिक्षण विभागाच्या सूचनेची वाट बघितली नसून वाचनासोबतच शाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या.''
-ए. जी. डोके, मुख्याध्यापिका, प्राथमिक, आदर्श माध्यमिक विद्यालय, बीड.