आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर 15 किलोचा भार; अपेक्षांच्या ओझ्याखाली जीव दमला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - इंग्रजीचा पाठ असो की, गणिताचा पाढा, पहिली-दुसरीमध्ये असूनही आमच्या मुलाला हे अगदी सहजपणे जमतं. वर्गातल्या मुलांमध्ये तो सगळ्यात पुढं आहे, सकाळपासून रात्रीपर्यंत तो कायम अभ्यासामध्ये व्यस्त असतो, असं सांगताना पालकांचा ऊर अभिमानाने भरून येतो. गुणवत्तेच्या कसोटीवर हे कौतुकास्पद असलं तरी बालवयात पाल्यावर पडत असलेली भलती जबाबदारी, वाढलेल्या अपेक्षा आणि स्पध्रेचा प्रवास, यामध्ये त्याचं जगणं जणू अपेक्षांच्या ओझ्याखाली असल्याचे वास्तव समोर आले आहे. ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी केलेल्या पाहणीतून शिक्षण व्यवस्थेसह पालकांना आत्मपरीक्षण करायला लावणारे निष्कर्ष हाती आले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे दिसून आले.
इयत्ता 4 थी मधील सानिका. वय 9 वर्षे. वजन 25 किलो, पाठीवरच्या दप्तराचे वजन मात्र 10 किलो. शाळेत जाताना-येताना हा 10 किलो वजनाचा भार पाठीवरून पेलताना तिची दमछाक होते. याच वर्गातील आदित्य मोरे. दप्तराचे वजन 7 किलो, सुकन्या, मयुरी. सगळ्यांची स्थिती जवळपास सारखीच. 3 री असो की 4 थी, अगदी 9 ते 10 वर्षे वयाच्या मुलांवर दप्तराच्या ओझ्याचा भार वाढतच चालला आहे. अगदी पहिलीपासून 10 वीपर्यंत ही सार्वत्रिक ओरड आहे. ही बाब पालक, शिक्षकांच्या लक्षात येत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येकाकडे उत्तर एकच ‘पर्याय नाही, शिक्षण प्रणालीचाच दोष आहे.’ मात्र, परिस्थितीचा कोणीही विचार करायला तयार नाही. अगदी 15-20 वर्षांपूर्वीच्या शिक्षण प्रणालीचा विचार केल्यास दप्तरांचा भार अगदीच किंचित होता. स्पर्धा वाढली म्हणून, मुलांकडून अपेक्षा वाढत गेल्या.
विशेषत: शहरी भागात मागणीप्रमाणे, शिक्षणप्रणालीच्या सूत्राप्रमाणे विद्यार्थ्यांवर पुस्तकांसोबत वह्या, रजिस्टर, स्वाध्याय पुस्तिकांचा मारा सुरू झाला आहे. मुला-मुलींच्या अपेक्षा पूर्ण करताना पालकही दप्तरांच्या ओझ्याबद्दल शब्द काढायला तयार नाहीत. वाढत्या स्पध्रेत आपला पाल्य सर्वात पुढे दिसायलाच हवा, या मानसिकतेमुळे घरापासून शाळेपर्यंत 10 ते 15 किलो वजनाचे दप्तर पाठीवर घेऊन जाताना चिमुकल्यांना काही वेदना होत असतील काय, याचा विचार करायलाही पालकांना वेळ नाही. विचार केल्यास एवढय़ा वजनदार दप्तराची गरज आहे का, याचे उत्तर नाही, असेच मिळते. ‘दिव्य मराठी’च्या पाहणीतून काही बाबी स्पष्टपणे पुढे आल्या असून, बहुअंशी विद्यार्थ्यांना गृहपाठासह सगळ्याच वह्या, स्वाध्याय पुस्तिका किंवा पुस्तकांची दररोज गरज नसते. मात्र, गुरुजींच्या धाकामुळे विद्यार्थी त्यासाठी हट्ट धरतात. वर्तमान शिक्षणप्रणालीमध्ये वरिष्ठांकडून स्वाध्याय पुस्तिकांचा आग्रह धरला जात आहे. शिक्षक कुठल्या विषयांच्या अभ्यासाची पाहणी करतील, याचा नेम नसतो. त्यामुळे सर्व विषयांची पुस्तके, गाइड, रजिस्टर, गृहपाठ, वर्गपाठाच्या वह्या एकाच दप्तरामध्ये शाळेत आणल्या जातात. त्यातच जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, असा 10 ते 15 किलोपर्यंतचा भार वाढत जातो. विशेषत: शाळेच्या पायर्‍या चढून जाणार्‍या विद्यार्थ्यांना या ओझ्याचा त्रास जाणवतो.
पुढील स्लाइडमध्ये, भविष्यात हे आजार उद्भवतील..