आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत बस वेळेवर येत नसल्यामुळे वाढतेय शाळकरी मुलींची छेडछाड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी ये-जा करणा-या विद्यार्थिनींचे हाल काही केल्या थांबेनात. विशेषत: पावसाच्या दिवसात तर मुलींना बसस्थानकावर सायंकाळी साडेसहा, सात वाजेपर्यंत मानव विकास व इतर बसगाड्यांची वाट पाहावी लागत असल्याने छेडछाडीचे प्रकार वाढले असून प्रवास असुरक्षित झाला आहे.


जिल्ह्यातील सेनगाव, हिंगोली आणि औंढा नागनाथ या तीन तालुक्यांची मानव विकास मिशनमध्ये निवड झाली आहे. या तालुक्यांना प्रत्येकी पाच बसगाड्या मिळाल्या असून मुलींना शाळेत आणणे आणि सायंकाळी, दुपारी पुन्हा गावात नेऊन सोडण्याची जबाबदारी बसेसवर आहे. सुमारे तीन हजार मुलींना या योजनेचा लाभ होत आहे. याशिवाय मानव विकास मिशनमध्ये निवड न झालेल्या कळमनुरी आणि वसमत या तालुक्यांमधील सुमारे 2 हजार मुली गावाबाहेरील शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात. या मुलींना इतर बसगाड्यांच्या वेळापत्रकानुसार जा-ये करावी लागते. शासनाने मुलींना मोफत प्रवासाची व्यवस्था करून दिली असल्याने पालकांची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे, परंतु मानव विकासच्या बसगाड्या शाळा सुरू असलेल्या वेळेत जवळच्या फे-या करीत आहेत. या फे-यांमध्ये बसगाड्यांचे वेळापत्रक मात्र पार बिघडले आहे. साडेपाच वाजता शाळा सुटल्यानंतर साधारणत: सहा, सव्वासहा वाजता मुलींना बस मिळणे गरजेचे आहे, परंतु बसगाड्या 7 वाजेपर्यंत बसस्थानकातच येत नाहीत. ही समस्या विशेषत: औंढा नागनाथ तालुक्यातील मुलींना सतावत आहे. या डोकेदुखीमुळे विद्यार्थिनींनी दोन वेळेस आंदोलनही केले होते, परंतु आतापर्यंत वेळापत्रकात सुधारणा झाली नाही, तर कळमनुरी व हिंगोलीतील बसस्थानकात मुलींची छेडछाड करण्याच्या प्रकारांनी कहर केला आहे. बसगाड्यांना जसजसा उशीर होतो, तसतशी रोमिओंना ताकद मिळते.


बन भागातील मुलींना घरी जाण्यास वाजतात रात्रीचे 9
सेनगाव तालुक्यातील बरडा आणि त्यापुढे एक किमी अंतरावरील बन भागातील मुलींना सेनगाव येथून शिक्षण घेऊन घरी परतण्यासाठी बहुतांश वेळी रात्रीचे नऊ वाजतात. सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालय गावापासून तीन किमी अंतरावर आहे. महाविद्यालय सुटल्यानंतर मुलींना प्रथम सेनगावात जाण्यासाठी सायंकाळचे सहा वाजतात. सेनगाव वसस्थानकात बसची वाट पाहत सात वाजतात. त्यानंतर सेनगावपासून सुमारे 40 किमी अंतरावरील बरडा, बन येथे संपूर्ण खड्डेमय रस्त्याने जावे लागते. 40 किमीच्या अंतरासाठी किमान दोन तास लागत असल्याने रात्री 9 च्या आत घरात राहण्याऐवजी मुलींना घराबाहेरच राहावे लागते. या परिस्थितीचा परिणाम विशेषत: बारावीच्या मुलींच्या अभ्यासावर होत आहे.


बसगाड्यांना उशीर न करण्याच्या सूचना
बसगाड्या कोणत्याही स्थितीत सहा ते सव्वासहा वाजेच्या दरम्यान स्थानकामधून बाहेर पडतील याची दखल घेण्याच्या सूचना सर्व आगारांना दिल्या आहेत. याशिवाय बाहेरगावहून आलेल्या विद्यार्थिनींना शाळा, महाविद्यालय सुटण्याच्या वेळेवर बाहेर सोडण्याच्या सूचना सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी बसगाड्या उशिरा आल्याने रात्रीचा फायदा घेऊन मुलींची छेडछाड होण्याचे प्रकार घडत असल्याचे कानावर आले आहे, परंतु तशी तक्रार केल्यास मुलींचे नाव उघड न करता संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल.’
एम.एन. राऊत, जिल्हा समन्वयक, मानव विकास मिशन.