आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षातील 365 दिवस भरते एकुरकाची जिल्हा परिषद शाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिराढोण- जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी धडपडत असलेल्या अनेक शिक्षकांमध्ये कळंब तालुक्यातील एकुरका  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक शिवदास भागवत यांचाही प्रयत्न कौतुकास्पद आहे. गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांच्या मदतीने या शिक्षकाने शाळेचा कायापालट केला असून वर्षातील ३६५ दिवस ते शाळेसाठी वेळ देऊन शाळेत राबवत असलेल्या विद्यार्थीउपयोगी विविध उपक्रमांमुळे इतर शाळांसाठीही आदर्श ठरले.  
  
एकुरका येथे इयत्ता पहिली ते ७ वीपर्यंतची जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा असून येथे १७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ व शाळेतील शिक्षक शिवदास भागवत यांनी इतर शिक्षकांच्या मदतीने शाळेत करावयाच्या कामांचा आराखडा तयार करून तो ग्रामस्थांसमोर मांडला. या अावाहनाला प्रतिसाद मिळून ४ वर्षांत २ लाख रुपये लोकसहभागातून जमा झाले. या लोकसहभागातून शाळेत परसबाग, भाजीपाला शेती, शाळेची रंगरंगोटी, ई-लर्निंग, योगाभ्यास, मल्लखांब यासारख्या अनेक  उपक्रमांवर खर्च करून शाळेचा कायापालट करण्यात आला आहे. 

सहशिक्षक शिवदास भागवत यांना सर्वतोपरी सहकार्य होत आहे. शाळेला असणाऱ्या दिवाळी, उन्हाळी सुट्या  तसेच सणाच्या सुट्या, रविवारी आदी दिवशीही शिवदास भागवत हे आपला वेळ शाळेतच घालवतात. शाळेसाठी भागवत यांच्या पत्नी गीता भागवत या  शाळा सुटल्यानंतर शालेय अभ्यासक्रमावर आधारित तासिका त्यांच्या घरीच मोफत घेतात. 

भाज्यांचा पोषण आहारात समावेश     
शाळेच्या आवारातच शिक्षक व ग्रामस्थांच्या श्रमदानातून पालेभाज्यांचेही उत्पादन होते. शालेय पोषण अाहारात रोज याच ताज्या व शाळेत उत्पादित केलेल्या भाज्यांचा समावेश केला  जातो. यात गोबी, मेथी, पालक अशा भाज्यांची शाळेतच लागवड करून त्याचे संगोपन केले जात आहे.   

शाळेला गावाचा आधार
शाळेला गावाचा व गावाला शाळेचा आधार या उक्तीप्रमाणे कोणत्याही शाळेचा सर्वांगीण विकास हा गावकऱ्यांच्या मदतीशिवाय शक्य नाही. एकुरका गावातील ग्रामस्थांना शाळेविषयी असणारी आपुलकी यामुळेच शाळेचा कायापालट होऊ शकला आहे. -शिवदास भागवत, सहशिक्षक, एकुरका.   

सर्व शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या विकासासाठीची धडपड पाहून शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून  जास्तीत जास्त प्रवेश जिल्हा परिषद शाळांमध्ये व्हावे यासाठी प्रयत्नशील आहोत. गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थी निपुण व्हावेत यासाठी प्रयत्न करत आहोत.   
- राजेंद्र खोत, मल्लखांब प्रशिक्षक, एकुरका.   
बातम्या आणखी आहेत...