आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिक्षेवर चालते शाळा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघात घडलेल्या व चौथी उत्तीर्ण असणा-या रामकिसन सोळंके यांनी स्वत:चे घर व शेत विकून लिखित पिंप्री (जि. जालना) येथे ज्ञानमंदिराची उभारणी केली. सन 1993 मध्ये दहा गावांतील सतरा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाने संत तुकाराम गुरुकुलचा श्रीगणेशा केला. गुरुकुलाचा खर्च भागवण्यासाठी पाच गावांतून धान्यरूपाने भिक्षाही मागण्यात आली. सामाजिक कार्य म्हणून अनेकांनी मदतही केली. हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत आज हा आश्रम मोठ्या दिमाखात सुरू आहे.

गरिबांच्या मुला-मुलींना शिक्षणासोबतच संस्काराचे धडेही गुरुकुलात मिळत आहेत. 16 मुलींना दत्तक घेऊन सोळंके यांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे. आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून सहा प्रशिक्षित शिक्षक अल्प मोबदला मिळत असतानाही मानसिक समाधान मिळवण्यसाठी ज्ञानदानाचे कार्य करतात. एखाद्या मोठ्या शाळेला लाजवेल असेच शाळेचे नियोजन असून दुसरीच्या वर्गातील विद्यार्थीही इंग्रजीचे धडे न अडखळता वाचतो. गुणवत्ता असली तरी अद्यापही शाळेला मात्र शासनाने मान्यता दिलेली नाही. सहा वर्षांपासून मान्यतेसाठी संघर्ष सुरू आहे. सन 2006 पासून शाळेच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला असला तरी अनेक कारणे दाखवत शासनाने प्रस्ताव मान्यतेसाठी नाकारला आहे.
पाच ते सहा वेळा प्रस्ताव सादर करूनही शासन मान्यता देत नसल्याने मात्र संत तुकाराम गुरुकुलाची स्थिती आता बिकट होत चालली आहे. आश्रमाची 61 आर जमीन असून या जमिनीवर 11 वर्गखोल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या निवासासाठी मोठे तीन हॉल, स्वयंपाकगृह, 6 स्नानगृहे, 15 शौचालये, जलकुंभ, 3 बोअर, पिठाची गिरणी, स्वयंपाकासाठी बायोगॅस, पाणी फिल्टर आणि विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात अभ्यासाला बसण्यासाठी सागाच्या 300 झाडांमध्ये 25 सिमेंटचे बेंच आहेत.शाळेसाठी स्वतंत्र जागा असून या ठिकाणी अकरा वर्गखोल्या आहेत.
सोळा मुलींना घेतले दत्तक
* सोळंके दांपत्याने आपली समाजसेवा येथेच न थांबवता 16 मुली दत्तक घेतल्या आहेत. नवरात्रीपासून त्यांनी हा उपक्रम सुरू केला असून त्या येथे शिक्षण घेत आहेत.
* रामकिसन व त्यांच्या पत्नी विजया सोळंके यांना अपत्य नाही, पण त्यांच्या मांडीवरील अवघ्या वर्षभराची कन्या पाहिल्यानंतर खºया मातृत्वाची येथे प्रचिती येते. दत्तक मुलींच्याच नव्हे, तर आश्रमातील सर्वच विद्यार्थ्यांच्या मायमाउली होण्याचे सौभाग्य त्यांना मिळाले आहे.
* संस्थेने पालकत्वाचे आवाहन केल्यानंतर सामाजिक ऋण म्हणून 11 हजार रुपयांची मदत करत या मुलींचे पालकत्व परतूरचे वैजनाथ दहिवाळ आणि माजी आमदार वैजनाथराव आकात यांनी स्वीकारले. आणखीही पालकत्व स्वीकारणारे हात पुढे येणे गरजेचे आहे.
*स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण वाढले आहे. जन्मलेल्या मुलीही काहींना नकोशा वाटतात. ज्या पालकांना आपल्या मुलीचे संगोपन, शिक्षण, विवाह खर्च करणे शक्य नाही, अशा मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी या दांपत्य व गुरुकुलाने घेऊन समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.

शाळेचे यशस्वी माजी विद्यार्थी
श्री संत तुकाराम गुरुकुल आश्रमात शिक्षण घेतलेले शरद नारायण चौधरी कॉम्प्युटर इंजिनिअर असून सध्या ते पुणे येथे कार्यरत आहेत. विशाल प्रभाकर ढगे (रा. तलवडा, ता. माजलगाव, जि. बीड) सध्या औरंगाबाद येथे बी.ई. मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. लिखित पिंप्री येथील सुनील राम शिंदे वैद्यकीय अधिकारी झाले आहेत. मंठा तालुक्यातील कठाळा खुर्द येथील किरण दशरथ खरात यांनी फूड टेक्नॉलॉजीमध्ये बी. टेक. पदवी घेतली असून सध्या ते रायगड येथे कार्यरत आहेत.

शिक्षण व नीतिमत्तेचेही धडे
आज शासनाकडून शिक्षणासाठी लाखो रुपये अनुदान दिले जाते, परंतु विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा मात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. संत तुकाराम गुरुकुलात सर्व भौतिक, शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. आश्रमातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना नीतिमत्तेचेही धडे देण्यात येतात. गंगाराम बहाड, शिक्षक

पालकांचा विश्वास सार्थ
संत तुकाराम गुरुकुल आश्रम ग्रामीण भागात आहे. असे असतानाही अनेक पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवून पाल्य शाळेत पाठवले आहेत. कार्यकर्त्यांनीही आपल्या भविष्याची चिंता न करता अल्पमानधनावर सेवा देण्याचा उपक्रम सुरू ठेवला आहे. सर्वांच्याच सहकार्याने हे कार्य सुरू आहे. खरे पाहिले तर जनतेने जनतेसाठी चालवलेले हे ईश्वरीय कार्य आहे. रामकिसन सोळंके, संस्थापक अध्यक्ष, लिखित पिंप्री, ता. परतूर, जि. जालना