परभणी - औरंगाबाद येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या विनाअनुदानित शिक्षक कृती समितीवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या गुरुवारच्या (दि. सहा) शैक्षणिक बंदला शहरासह जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व शाळा-महाविद्यालयांनी कडकडीत बंद पाळून निषेध नोंदवला.
परभणी जिल्हा शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने बुधवारी (दि.पाच) जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना यासंदर्भातील निषेधाचे निवेदन देत गुरुवारचा शैक्षणिक बंद पुकारला होता. त्यामुळे शहरातील सर्वच शाळांनी सकाळपासूनच बंद पाळला. सकाळच्या सत्रात आलेले विद्यार्थी घरी परतल्याने व शाळांनी बंद जाहीरच केल्याने दुपारच्या सत्रातील शाळांना विद्यार्थी हजरच झाले नाहीत. महाविद्यालयांनीदेखील बंदमध्ये सहभाग नोंदवला. दरम्यान, आपल्या मागण्यांसाठी सनदशीरपणे आंदोलने करणाऱ्या शिक्षक कृती समितीतील शिक्षकांच्या मोर्चावर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. यात शिक्षक जखमी झाले होते.
लातूरमध्येही उमटले पडसाद, शाळा बंद करून काढला मोर्चा
लातूर - औरंगाबादमध्ये शिक्षकांच्या मोर्चावर झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद गुरुवारी लातूरमध्ये उमटले. शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षक संघटनांनी शाळा बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. औरंगाबादमध्ये शिक्षकांच्या मोर्चावर लाठीमार करण्यात आल्याचा आरोप करत लातूरच्या सर्व शिक्षक संघटनांची आणि संस्थाचालकांची बुधवारी एकत्रित बैठक झाली. त्यामध्ये गुरुवारी बंद पाळण्याचा निर्णय झाला. गुरुवारी इंग्रजी वगळता सर्व माध्यमांच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या. काही शाळा दुपारनंतर सोडण्यात आल्या. त्यानंतर टाऊन हॉल मैदानातून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. शिक्षकांवर दाखल केलेले गंभीर गुन्हे परत घेण्याची मागणी करण्यात आली.