आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोडमध्ये सापडली विंचवाची नवी जात !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - जैवविविधतेचा अभ्यास करणार्‍या तीन युवकांनी विंचवाची नवी जात शोधली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात त्यांना हा विंचू आढळला असून त्याला ‘निओ स्कॉर्पिओप्स महाराष्ट्राएन्सिस’ हे नाव देण्यात आले आहे. आतापर्यंत देशात विंचवाच्या 114 प्रजाती होत्या. त्यात आता या नव्या प्रजातीची भर पडली आहे. फ्रान्सच्या कॉम्पट्स रेंड्स बायोलॉजी या प्रख्यात मासिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. यात जालन्याचा युवा संशोधक रमण उपाध्ये याचे मोठे योगदान आहे.

मराठवाड्यातील जैवविविधतेबाबत अद्याप फारसे संशोधन झाले नाही. मात्र, बंगळुरू येथील संशोधक झिशान मिर्झा, मुंबईचा राजेश सानप आणि जालन्याचा रमण उपाध्ये या तीन युवकांनी मराठवाड्यातील विविध भागांमध्ये भटकंती करून जैवविविधतेबाबत संशोधन सुरू ठेवले आहे. त्यातूनच वडाळीवळ (ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) येथे त्यांना एक वेगळ्या प्रकारचा विंचू आढळून आला. संशोधनानंतर विंचवाची ही नवीन प्रजाती असल्याचे स्पष्ट झाले. देशात आतापर्यंत विंचवाच्या केवळ 114 प्रजाती अस्तित्वात होत्या. आता ही संख्या 115 वर पोहोचली आहे. मराठवाड्यात हा विंचू सापडल्यामुळे त्याला निओ स्कॉर्पिओप्स महाराष्ट्राएन्सिस हे नाव देण्यात आले आहे.

जीवशास्त्राचे शोधनिबंध प्रसिद्ध करणार्‍या फ्रान्स येथील कॉम्पट्स रेंड्स बायोलॉजी या र्जनलने या शोधनिबंधाला नुकतीच प्रसिद्धी दिली आहे. कीटकभक्षी असलेल्या विंचवाचे अन्नसाखळीत मोठे महत्त्व आहे. मात्र, त्यांच्या अनेक प्रजाती संशोधन होण्यापूर्वीच नष्ट होत आहेत.

मान्यता मिळवण्यासाठी सहा महिन्यांचा प्रवास
सिल्लोड तालुक्यातील शिडी घाट येथे या संशोधकांना 28 जुलै 2013 रोजी हा विंचू सापडला. त्यानंतर त्यांनी यावर अभ्यास करून 16 नोव्हेंबर 2013 रोजी ते फ्रान्सच्या कॉम्पट्स रेंड्स बायोलॉजी या संशोधन मासिकाला पाठवले. या मासिकाने 27 नोव्हेंबर 2013 रोजी हे संशोधन स्वीकारले व 6 फेब्रुवारी 2014 रोजी ते ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आले. या तिघा संशोधकांना यासंदर्भात 28 फेब्रुवारी 2014 रोजी त्याची अधिकृत माहिती देण्यात आली.

असा घेतला जातो शोध
अल्ट्रा व्हायोलेट लाइटच्या प्रकाशात विंचवाचा शोध घेतला जातो. विंचवाच्या शरीरात विशिष्ट प्रकारचे रसायन असते. त्यावर हा प्रकाश पडल्यानंतर विंचवाचा रंग पांढरा दिसतो. त्यामुळे त्याचे अधिक बारकाईने परीक्षण करता येते. विंचू वेगळ्या प्रजातीचा असल्यास इतर प्रजातींशी तुलना केली जाते. त्यानंतर त्याला नाव दिले जाते. त्यासाठी जीवशास्त्रातील टॅक्सॉनॉमी या विभागाची मदत घेतली जाते.

अधिक संशोधन व्हावे
जैवविविधतेच्या दृष्टीने पश्चिम घाटाकडे अधिक लक्ष दिले जाते, तर दख्खनच्या पठाराकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. आम्ही त्यावर संशोधन करतो आहोतच. विंचवाची ही नवी प्रजाती येथे आढळली आहे. त्यामुळे यावर अधिक संशोधन व्हावे तसेच येथील जैवविविधतेचे संरक्षण व्हावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. रमण उपाध्ये, संशोधक, जालना

वैशिष्ट्ये : या विंचवाची लांबी 36 ते 42 मिमी असून बदामी, विटकरी रंग आहे. नांगीचा भाग आणि पाय पिवळसर पांढर्‍या रंगाचे आहेत. शरीराच्या मुख्य भागावर इंग्रजीतील यू आकाराचे चिन्ह आढळून आले आहे. इतर विंचवांच्या तुलनेत अधिक वेगाने पळतो. या विंचवाची मादी नर विंचवापेक्षा अधिक चपळ आहे.