आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीलबंद सिलिंडर पेटलेच नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उंडणगाव- आधुनिक काळात अनेक गोष्टींमध्ये भेसळ असल्याचे दिसून येते. त्यातून स्वयंपाकाचा गॅसदेखील सुटला नसल्याचे उंडणगावात आढळून आले. सीलबंद गॅस टाकी पेटतच नसल्याने गॅसधारक त्रस्त झाले असून एजन्सीधारकाकडे तक्रार करूनही काही उपयोग होत नसल्याने ग्राहकांत संतापाचे वातावरण आहे. चक्क सीलबंद टाकीच रिकामी निघाल्याने विश्वास कोणावर ठेवावा, अशा संभ्रमात ग्राहकवर्ग सापडला आहे.
उंडणगाव येथे दर शुक्रवारप्रमाणे या शुक्रवारी सिल्लोडहून भारत गॅसची गाडी आली. यातून गावातील सुमारे 40 ग्राहकांनी गॅस घेतले. यातील सात सीलबंद गॅस काही काळ पेटले व नंतर बंद झाले. ते पुन्हा पेटलेच नाही.
लोकांना वाटले रेग्युलेटरमध्ये किंवा नळीत काही खराबी असावी. मात्र तपासणी केल्यावर सर्व व्यवस्थित होते. परंतु गॅस टाकी सुरू नसल्याने थेट एजन्सीधारकाकडे तक्रारी केल्या. परंतु एजन्सीधारकाने रेग्युलेटर तपासणी करावी अशा सूचना दिल्या. मात्र, काही केल्या गॅस पेटलेच नाही. एकूणच सीलबंद टाक्यांचे वजन भरलेल्या टाक्यांइतकेच असूनही विश्वासपात्र नसल्याचा अनुभव उंडणगाववासीयांना आला. न पेटणार्‍या टाकीविषयी एजन्सीने सखोल चौकशी करून दुसर्‍या टाक्या द्याव्यात, अशी मागणी गॅसधारकांनी केली आहे.
गॅसचे क्रमांक
बीपीसी 1.67,एमपी- आयएस 8737
एमओ 1 डी 13 सीएम/एल 1358654
कृष्णा उकर्डे, ग्राहक क्र. 21868
कसे समजून घेणार
गॅस टाकीवर लोखंडी पट्टीवर लिहिलेला तपासणी क्रमांक असा समजवून घ्यावा
ए - जानेवारी, फेब्रुवारी, मार्च
बी.- एप्रिल, मे, जून
सी - जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर
डी - ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर
असा इंग्रजीच्या अल्फाबेटचा अर्थ काढला जातो व त्यापुढे 11, 12, 13,14, असे लिहिलेले असते. ते वर्ष समजले जाते. उदा. सी- 13 म्हणजे सप्टेंबर 2013 असा त्या टाकीचा मुदतबाह्य दिनांक आहे.
सिलिंडरचे वजनही योग्यच
गावात सात ग्राहकांच्या टाक्यांचे वजन करण्यात आले. सर्व सिंलिंडरचे वजन भरलेल्या टाकीएवढेच म्हणजे 28 किलो आढळून आले. सर्व काही व्यवस्थित असूनही गॅस का पेटत नाही हे एक न उलगडणारे कोडेच होय.
गॅस टाकी सीलबंद असल्यावर ती रिकामी असावी असे होत नाही. याबाबत गॅस व रेग्युलेटर तपासावे लागेल व नेमका दोष कशात आहे हे पाहावे लागेल. बबन देशमुख, व्यवस्थापक, मारुती गॅस एजन्सी सिल्लोड
शुक्रवारी गॅस टाक्या घेतल्या. घरी गेल्यावर जोडणी केली. काही काळ गॅस पेटला व नंतर विझला तो पुन्हा पेटलाच नाही. एजन्सीधारकाकडे तक्रार केली. रेग्युलेटर तपासले. सर्व व्यवस्थित होते. -विष्णू नरवडे, गॅस ग्राहक