आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळात दिलासा: कोट्यामध्ये स्वच्छ केली जातेय दुसरी टँकर रेल्वे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - राजस्थानातील कोटा येथील रेल्वेच्या दुरुस्ती कारखान्यात दुसऱ्या टँकर रेल्वेच्या स्वच्छतेचे काम सुरू असून रविवारपर्यंत ती मिरजेकडे रवाना केली जाणार आहे. त्यानंतर लातूरला तीन दिवसाला ५० डब्यांच्या दोन रेल्वेद्वारे पाणी दिले जाणार आहे.
लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट झाल्यामुळे रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा विचार पुढे आला होता. पंतप्रधान कार्यालयाने यात लक्ष घातल्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून ५० हजार लिटर क्षमतेची ५० टँकर असलेली एक रेल्वे गुढीपाडव्यादिवशी मिरजेला पाठवून देण्यात आली होती. त्यातील १० टँकर वॅगनमध्ये पाणी भरून चाचणी तत्त्वावर पहिली रेल्वे मंगळवारी पहाटे लातूरला पोहोचली होती. दुसऱ्या टप्प्यात आणखी एक ५० टँकर वॅगनची रेल्वे पाठवण्यात येणार असून कोटा येथील रेल्वेच्या दुरुस्ती कारखान्यात सध्या या रेल्वेची स्वच्छता सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी सकाळी ही गाडी मिरजेकडे जाण्यासाठी तयार असेल. तांत्रिक परवानग्या मिळाल्यानंतर जास्तीत जास्त रविवारपर्यंत ही गाडी मिरजेकडे रवाना होईल. दोन दिवसांत ती तेथे पोहोचलेली असेल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दोन रेल्वे गाड्या उपलब्ध झाल्यानंतर लातूरला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे सोयीचे होणार आहे. एका गाडीतून २५ लाख लिटर या प्रमाणे पाणीपुरवठा करता येणार आहे.

शुक्रवारी स्वच्छता पूर्ण होईल
कोटा येथील कारखान्यात ५० टँकर वॅगनची स्वच्छता सुरू आहे. हे टँकर पेट्रोल, डिझेल, ऑइल साठी वापरण्यात येतात. त्यामुळे पाण्यासाठी वापरण्यापूर्वी याची चांगल्या पद्धतीने स्वच्छता करणे गरजेचे असते. आतून पूर्णपणे पेपरने घासणे, वाफेच्या फवाऱ्यांनी स्वच्छ करून निर्जंतुक करणे, रंगरंगोटी करणे ही कामे सुरू आहेत. शुक्रवारी ही कामे पूर्ण करून टँकर रेल्वे कारखान्याच्या बाहेर काढली जाईल.
- प्रवीणकुमार तिवारी, कारखाना मॅनेजर
बातम्या आणखी आहेत...