आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Left Leader Comrade Govind Pansare Attacked

मराठवाडा हळहळला! ‘मारेक-याला जेरबंद करा’ भाकप, माकपसह विविध संघटनांचे आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- कॉम्रेड गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर गोळ्या झाडून प्राणघातक हल्ला करणाऱ्यांचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.१६) काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निषेध नोंदवला. मराठवाड्यातही आंदोलन करून मारेकऱ्यांना जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली.

भाकपचे नेते तथा प्रख्यात विचारवंत कॉम्रेड पानसरे व त्यांच्या पत्नीवर सोमवारी सकाळी गोळ्या झाडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. याबाबतची माहिती मिळताच संघटनांनी या प्रकाराचा निषेध नोंदविला. हे भ्याड कृत्य प्रतिगामी अतिरेक्यांचेच आहे. हल्ल्याची पद्धती संपूर्णत: नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसारखीच असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचे भाकपने म्हटले आहे. कॉ. पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाद्वारे रयतेचा राजा शिवाजी ही शिवरायांची खरी ओळख करून दिली. अंधश्रद्धा निर्मूलनात ते अग्रेसर आहेत. याचबरोबर कोल्हापूर येथील टोलविरोधी आंदोलनाचे अग्रणी नेते आहेत. सातत्याने कामगार कष्टकऱ्यांसाठी आयुष्य झिजवणाऱ्या या विचारवंतावरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात येत असल्याचे म्हटले आहे. या षड्््यंत्राचा छडा लावून प्रतिगामी अतिरेक्यांना जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. निदर्शनात कॉ. राजन क्षीरसागर, अॅड. माधुरी क्षीरसागर, अॅड. लक्ष्मण काळे, संदीप सोळुंके, शेख अब्दुल, सचिन देशपांडे, गजानन देशमुख, संजय गायकवाड, गणपत गायकवाड, शेख एजाज, शेख मुनीर, माकपचे कीर्तिकुमार बुरांडे, लाल सेनेचे गणपत भिसे, महीप रेवणवार, अनिता धोंगडे, मंगला खामगावकर, पवन दुबे आदींसह विविध संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
‘हा तर लोकशाहीला काळिमा’
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा डावी आघाडी, कामगार संघटना व आपच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. लोकशाहीत शांततामय मार्गाने होणाऱ्या आंदोलन करणाऱ्या नेत्यांवर अशा प्रकारचे भ्याड हल्ले होत असतील तर ही घटना लोकशाहीला काळिमा फासणारी आहे, अशा शब्दांत या संघटनांनी या घटनेचा निषेध केला. निदर्शनांनंतर आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करून पानसरे दांपत्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना त्वरित अटक करण्याची मागणी केली. या वेळी निषेधांच्या घोषणा देण्यात आल्या.
गंभीर धोक्याचा निर्देश : वाघमारे
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा येथील विविध संघटना व नागरिकांनी जाहीर निषेध केला. सोमवारी दुपारी शहरातील गांधीजींच्या पुतळ्यासमोर नागरिक जमले. त्यांनी निषेधाच्या घोषणा देऊन हल्लेखोरांच्या अटकेची मागणी केली. खासदार जनार्दन वाघमारे यांनी पानसरे यांच्यावरील हल्ला म्हणजे वाढत्या संघटित फॅसिस्ट शक्तीचा दाखला असून पुरोगामी महाराष्ट्रासाठी हा एक गंभीर धोक्याचा िनर्देश असल्याचे सांगितले. रामकुमार रायवाडीकर, सुनीता आरळीकर, वैजनाथ कोरे, गणपतराव तेलंगे, सविता कुलकर्णी, उत्तरेश्वर बिराजदार, सुधाकर देशमुख, गोविंद शृंगारे, अॅड. उदय गवारे, डाॅ. श्रीराम गुंदेकर, अॅड. मनोहरराव गोमारे, अरविंद काबळे, अॅड. खुशालराव सूर्यवंशी आदी उपस्थित होते.