आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sex Workers Woman And Children Now Get Adhaar Card

देहविक्री करणा-या महिला अन‌् मुलांनाही आता ‘आधार’ कार्ड; शासनाचाअभिनव उपक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - राज्यात विविध अडीअडचणी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा अन्य बाबींमुळे देहविक्री करणा-या महिला आणि त्यांच्या मुलांना आधार कार्ड मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे नसल्यामुळे ते वंचित राहतात. शासनाच्या योजना थेट त्यांच्यापर्यंत समन्यायिक पद्धतीने पोहोचाव्यात यासाठी राज्यभरात सोमवारपासून २८ फेब्रुवारीपर्यंत ‘आधार कार्ड’ देण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे.

भारतीय नागरिकांना सार्वजनिक ओळखपत्र ‘आधार कार्ड’च्या माध्यमातून देण्याचा उपक्रम केंद्र शासनामार्फत राबवला जात आहे. त्यानुसार राज्यातील देहविक्री करणा-या महिला व त्यांच्या मुलांना ‘आधार कार्ड’ देण्याची मोहीम जिल्हास्तर राबवण्याचा अध्यादेश शासनाने सहा फेब्रुवारी राेजी काढला. नऊ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या मोहिमेचा प्रारंभ करण्याचे निर्देशही अध्यादेशामध्ये देण्यात आले आहेत. अशा महिलांच्या कागदपत्रांच्या संदर्भात येणा-या अडचणी संबंधित सामाजिक संस्था, संघटना आणि आधार कार्ड देण्यासाठी जिल्हा पातळीवरील अधिकारी यांच्या साहाय्याने सोडवून सर्वांना आधार कार्ड देण्याचे सक्तीचे राहणार आहे. बीड जिल्ह्यात देहविक्री करणा-या महिला सुमारे अडीच हजार आहेत.

माेहिमेची कार्यपद्धती
नऊ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान देहविक्री करणा-या महिलांना आधार कार्ड देण्यासाठी विशेष मोहीम जिल्ह्यातील संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत राबवावयाची आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी मोहिमेचा प्रारंभ करतील. महिलांच्या सोयीचा दिवस, वेळ याचे नियोजन करण्याचे निर्देश उपसचिव म. बा. हजारी यांनी अध्यादेशात दिले आहेत.
समाजव्यवस्थेत स्थान देण्यासाठी
राज्य शासनाच्या योजना सर्वांसाठी असतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणा-यांचा देहविक्रीत समावेश असू शकतो. अशांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन त्यांचे पुनर्वसन करणे व समाजव्यवस्थेत स्थान देण्याचा प्रयत्न आहे.
नवलकशोर राम, जिल्हाधिकारी

पाेलिसांच्या सहकार्याने मोहीम
आधार कार्ड योजनेत कोणीही वंचित राहू नये यासाठी ही मोहीम आहे. आधार कार्ड दिल्यानंतर आकडेवारी स्पष्ट होईल. यापूर्वी देहविक्रय करणा-या महिला व मुले यासंदर्भात सर्व्हेक्षण झालेले नसून पोलिसांच्या सहकार्याने त्या-त्या भागात कार्ड दिले जाईल.
- डॉ. उमाकांत दांगट, विभागीय आयुक्त, औरंगाबाद