नांदेड - देगलूर पोलिस ठाण्यात तलाठी महिलेने दाखल केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीनंतर रविवारी दुपारी साडेतीन वाजता तहसीलदार जिवराज डापकर व चार वाजता अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पोलिसांना शरण आले. नांदेड येथे त्यांनी वकिलासह पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर सोमवारी पहाटे दोन वाजता त्यांची देगलूर पोलिस ठाण्यातून जामिनावर मुक्तता करण्यात आली.
देगलूर तालुक्यातील तलाठी महिलेने १ ऑगस्ट रोजी देगलूर पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रार केली. बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याकरिता कार्यमुक्त करण्यासाठी तहसीदार डापकर व अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विनयभंग करून शारीरिक सुखाची मागणी केली, असे महिलेने तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला.
गुन्हा नोंद झाल्यानंतर दोन्ही अधिकारी फरार झाले. त्यानंतर तब्बल सहा दिवसांनंतर त्यांनी पोलिसासमोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पणानंतर दोघांनाही जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले.
तक्रारकर्ता महिलेने पुरावा म्हणून ऑडिओ सीडी पोलिसांना दिली आहे. त्या सीडीची शहानिशा करण्यासाठी आवाजाचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिस देगलूर पोलिस ठाण्यात दाखल झाले.