आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निराधार मुलांना "शांतीवन'चा आधार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - कुणाच्या वडिलांचे अपघातात निधन झाले, तर कुणाला आई नाही, तर कुणाच्या बापानं कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या केली. मायेचं छत्र हरवून बसलेल्या चिमुकल्यांना शिरूर तालुक्यातील शांतीवन या सामाजिक प्रकल्पाने आधार दिला आहे. या मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारताना उच्च शिक्षण आणि लग्नाची जबाबदारीही शांतीवनाने उचलली आहे. बाबा आमटेंची प्रेरणा घेऊन सुरू केलेल्या कामासाठी मोडलेल्या माणसांची दु:ख ओली झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना, कोणती ना जात ज्यांची कोणता ना धर्म ज्यांना दु:ख भिजले दोन अश्रू माणसांचे माणसांना या बाबा आमटेंच्याच ओळी सार्थ ठरतात.

शिरूर तालुक्यातील आर्वी येथे २००० मध्ये सामाजिक कार्यकर्ते दीपक नागरगोजे यांनी शांतीवनची स्थापना केली. बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा. येथील कामगार सहा ते सात महिने स्थलांतरित होतात. अशा वेळी त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न समोर येतो. या मुलांना शिक्षण देता यावे यासाठी शांतीवन सुरू झाले अन् हळूहळू कामाच्या कक्षा रुंदावत जाऊन समाजातील उपेक्षित घटकांसाठीही शांतीवन हक्काचे घर बनले. ७० विद्यार्थ्यांचे पालकत्व शांतीवन परिवाराने स्वीकारले आहे. या मुलांच्या उच्च शिक्षणाची आणि मुलींच्या लग्नाला मदत करणे किंवा त्यांचे लग्न लावून देण्याची जबाबदारीही शांतीवनाने स्वीकारल्याचे दीपक नागरगोजे आणि कावेरी नागरगोजे यांनी सांगितले.

इथे प्रत्येकाची वेगळी गोष्ट
शांतीवनाने आधार दिलेल्या प्रत्येक चिमुकल्याची एक वेगळीच कहाणी आहे. नाळवंडीच्या ऊर्मिलाचे वडील ऊसतोड कामगार, ऊस घेऊन जात असताना अपघातात वडिलांचा मृत्यू झाला. शांतीवनाने तिला दत्तक घेतले. ही शांतीवनची पहिली दत्तक मुलगी. औरंगाबाद जिल्ह्यातील लखमापुरीच्या पायलच्या दारूड्या वडिलांनी आईचा खून केला. पायलच्या साक्षीमुळे तिच्या वडिलांना शिक्षा झाली आणि दोन भाऊ, एक बहीण यांच्यासह ती उघड्यावर आली. ही भावंडे काही वर्षांपासून शांतीवनात आहेत. ऊसतोडणीसाठी गेलेल्या वडिलांना कावीळ झाला. फडावर योग्य उपचार मिळाले नाहीत अन् त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. नम्रता, सुप्रिया आणि छोटा हरिओम यांच्यासह सहा वर्षांपासून आहेर वडगावची कोमल बाबर शांतीवनात आहे.

चार नवे मित्र
गेवराई तालुक्यातील रांजणी येथील महादेव सावंत यांनी सावकारच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. पाचवीत शिकणार्‍या सुजीतचे पालकत्व शांतीवनाने स्वीकारले आहे. जालना जिल्ह्यातील दोन चिमुकलेही दाखल झाले आहेत. आईला पेटवून दिल्याने वडिलांना अटक झाल्याने ते उघड्यावर आले होते. बीड येथील भाजीविक्रेत्या महिलेच्या मृत्यूनंतर तिची चिमुकलीही दाखल झाली आहे.

गुणवत्तेची झळाळी
शांतीवन करत असलेले काम शासनाच्या निधीशिवाय चालते. समाजातील दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीवर हे काम सुरू असून वसतिगृहात दोनशेवर मुले आहेत. तर शाळेची गुणवत्ता पाहून आजूबाजूच्या गावचे विद्यार्थीही शिक्षणासाठी येतात. यावर्षी दहावीच्या परीक्षेत शांतीवनच्या जनाबाई खरातने ८६ टक्के गुण घेतले तर कोमल बाबर आणि श्वेता सागर यांनी ८१ टक्के गुण घेतले. त्यांचे पुढील शिक्षणही आम्हीच करणार आहोत. दीपकनागरगोजे, अध्यक्ष बाबा आमटे मिशन
बातम्या आणखी आहेत...