आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपिटीचा तडाखा: केंद्रीय कृषिमंत्री पवार यांच्याकडून नुकसानाचा आढावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- गेल्या आठ दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील 18 ते 20 जिल्ह्यांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा जबर फटका बसला आहे. या अनुषंगाने केंद्रीय कृषिमंत्र्यांनी रविवारी सकाळी कळंब तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. रात्री झालेल्या पावसामुळे शेतशिवारात चिखल झाला आहे. घोटाभर चिखलातून मार्ग काढत तसेच बैलगाडीतून शरद पवार यांनी द्राक्ष बागेची पाहणी केली. या वेळी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, आमदार राणाजगजितसिंह पाटील हे सोबत होते.

उस्मानाबाद जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस व गारपिटीने प्रचंड हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार शनिवारी दुपारी विमानाने उस्मानाबाद दौर्‍यावर येणार होते, परंतु अवकाळी पावसाचा त्यांच्या हवाई दौर्‍याला फटका बसला. सायंकाळी उशिरा त्यांचा दौराच रद्द झाल्याच्या बातम्या आल्या. मात्र, शरद पवार कारने उस्मानाबादेत दाखल झाले. रात्र झालेली असल्याने त्यांनी नुकसानीच्या पाहणीचा शनिवारी होणारा दौरा रद्द केला. मात्र, रविवारी सकाळी 7.30 वाजताच शरद पवार नुकसानीची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले. त्यांनी कळंब तालुक्यातील वडगाव शिवारात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. वडगाव येथील शेतकरी दत्ता मुंडे व नवले यांच्या द्राक्ष बागेची पाहणी करून शेतकर्‍यांशी चर्चा केली. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील पाहणी केल्यानंतर त्यांनी शनिवारी सकाळी उस्मानाबाद येथील दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा वगळता रविवार व सोमवारी होणारे सर्वपक्षीय कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले.

परभणी जिल्ह्यातही पाहणी
परभणी: परभणी शहरासह जिल्ह्यातील वादळी वार्‍याने व गारपिटीने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गारपीटग्रस्त भागाचा रविवारचा (दि. नऊ) दौरा रद्द झाला, तर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी हेलिकॉप्टर दौरा रद्द करून मोटारगाडीद्वारे परभणी गाठले. यादरम्यान, पवारांनी मानवत तालुक्यातील झोडगाव या गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून शेतकर्‍यांशी संवाद साधला. दरम्यान, परभणी शहराला रविवारी दुपारपासून गारपिटीने व वादळी वार्‍याने झोडपून काढले. सायंकाळी उशिरापर्यंत शहरात जोरदार पाऊस झाल्याने मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. पत्रे उडाले, विजेचे खांब वाकले गेले, तारा पडल्याने संपूर्ण शहराचा वीजपुरवठा दुपारपासून रात्रीपर्यंत खंडित झाला होता. ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली.

शरद पवार दुपारी तीन वाजता परभणीत दाखल होऊन मानवत तालुक्यातील रत्नापूर व मानोली या गावांतील गारपीटग्रस्त भागास भेट देणार होते, परंतु ढगाळ वातावरणाने व त्यानंतर सुरू झालेल्या वादळी पावसाने त्यांनी हेलिकॉप्टरऐवजी मोटारगाडीने परभणी गाठली. येणार्‍या मार्गातच त्यांनी मानवत तालुक्यातील झोडगाव या गारपीटग्रस्त गावास भेट देऊन पाहणी केली. शेतकर्‍यांशी संवाद साधला. त्यानंतर ते मोटारीने सायंकाळी साडेसहाच्या सुमारास परभणीत दाखल झाले.

नेते चिखलात
नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या शरद पवार यांच्यासमवेत खासदार डॉ. पाटील, पालकमंत्री चव्हाण, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जीवनराव गोरे हे चिखलाचा रस्ता तुडवत द्राक्ष बागेपर्यंत गेले. या वेळी शरद पवार यांच्या पाठीमागे गाडीतून आलेले काही लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मात्र चिखलामुळे आपले बूट खराब होतील, कपडे मळतील म्हणून गाडीच्या खालीही उतरले नाहीत, ही बाबही चर्चेचा विषय होती.