आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचनाच्या निधीबाबत केंद्र राज्याच्या पाठीशी : शरद पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राकडून 30 हजार कोटी रुपये मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी तुळजापूरमध्ये दिली. नवीन बसस्थानकाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निधीसंदर्भात केलेल्या मागणीचा धागा पकडून पवारांनी हे आश्वासन दिले.

दुष्काळ, महापूर, भूकंपासारख्या आपत्ती काळात मदत करणार्‍या केंद्रीय समितीचा अध्यक्ष या नात्याने दावा करताना ते म्हणाले, दुष्काळात कुठल्याही राज्यात केल्या नसतील एवढय़ा उपाययोजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून यावर्षी महाराष्ट्रात करण्यात आल्या आहेत. परंतु कायमस्वरूपी पाणी आणल्याशिवाय गत्यंतर नाही.

ते म्हणाले, यावर्षी महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ भयंकर असून सरकारने कधी नव्हे एवढी यंत्रणा उभारून दुष्काळाचे निवारण करण्याचा प्रयत्न केला. बिकट स्थितीतही दुष्काळात उपाययोजना उभारून राज्यातील साडेपाच लाख पशुधन वाचवू शकलो.

चारा छावण्या, टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. अजूनही मराठवाड्यातील काही जिल्हे, सोलापूर, बुलडाणा, अकोला, माण, खटाव, नाशिकच्या काही भागात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे परिस्थितीचा विचार करून उपाययोजना सुरू राहिल्या पाहिजेत. खासदार डॉ.पद्मसिंह पाटील, पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केलेली मागणी बरोबर आहे. या भागात कायमचे पाणी आल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यासाठी राज्यातील सिंचन योजनांबाबत आम्ही प्रधानमंत्र्यांसोबत बैठक घेतली. योजना पूर्ण करण्यासाठी 60 हजार कोटींची गरज आहे. त्यापैकी 30 हजार कोटी केंद्र सरकारकडून मिळवून देण्यासाठी भक्कमपणे महाराष्ट्राच्या पाठीशी उभे राहू.