आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिसा सैल सोडल्यास गर्दी जमवणे अवघड नाही - शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - प्रचारसभांना झालेल्या गर्दीला फारसे महत्त्व नसते. मोदींच्या सभेच्या खर्चाची आर्थिक पडताळणी करून बघितलं तर ते लक्षात येईल. खिसा सैल सोडला तर सभेसाठी लोकं आणणं काही फार अवघड नाही, पण सभांना गर्दी होणं आणि प्रत्यक्ष निवडणुकीत मतदान मिळणं यात मोठे अंतर आहे. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर ते सगळ्यांनाच लक्षात येईल.

नरेंद्र मोदींनी भूकंपातील कामाबाबत लातूरच्या सभेत त्यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गुरुवारी भूंकपग्रस्त औशात जाहीर सभेसाठी आले होते. त्यावेळी दै.'दिव्य मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी मोदींना चांगलेच चिमटे घेतले. त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे.

प्रश्न : भूकंपात तुम्ही केलेल्या कामाचे विरोधकही कौतुक करीत आले आहेत. मात्र, काल मोदींनी भूकंपात तुम्ही काहीच केले नसल्याची टीका केलीय.
उत्तर : किल्लारीत 1993 मध्ये जेव्हा भूकंप झाला तेव्हा मी मुख्यमंत्री असलो तरी त्यावेळी नरेंद्र मोदीच लोकांच्या मदतीला धावून आले होते हे मी मान्य करतो. लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी यांच्या मदतीने त्यांनी लोकांचे अश्रू पुसले, जखमांवर फुंकर घातली, 15-15 दिवस तळ ठोकून राहिले, अन्न-पाण्याची सोय केली अन् पुढे राहायला घरेही बांधून दिली. मोदींशिवाय हे काम झालेच नसते हे मला पूर्णपणे मान्य आहे.

प्रश्न : भूकंपातील पुनर्वसनाचे काम हे तुमच्या राजकीय जीवनातील एक मैलाचा दगड मानले जाते. त्याच्यावर टीका करून मोदींनी तुमच्या वर्मावर घाव घातलाय का.
उत्तर : किल्लारीच्या भूकंपावेळी केलेल्या कामाची पावती म्हणून युनेस्कोसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी अनेकवेळा आपली भाषणे अमेरिकेसारख्या देशात आयोजित केली आहेत. त्यामुळे मोदींसारख्यांच्या पावतीची आपल्याला गरज नाही. याउलट जेव्हा गुजरातला भूकंप झाला त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सर्वपक्षीय बैठक झाली. त्यावेळी पुनर्वसनाच्या अनुषंगाने चर्चा झाली. त्यामध्ये एक अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय झाला. लातूरमध्ये भूकंपात पुनर्वसनाची कामे ज्या पद्धतीने झाली होती त्याचा उल्लेख करून खुद्द वाजपेयी आणि सोनिया गांधी यांनी संयुक्तपणे अध्यक्षपदासाठी आपल्या नावाची शिफारस केली. आपल्या अभ्यासगटाने दिलेला अहवाल पुढे केंद्रीय मंत्रिमंडळाने संसदेसमोर ठेवला आणि तो मंजूर झाला. त्यामुळे त्यांचे अज्ञानच उघडे पडले आहे. त्यात वर्मावर घाव घालायचा प्रश्नच नाही. त्याला मी फारसे महत्त्व देत नाही.

प्रश्न : मोदींना तुम्ही महत्त्व देत नाही म्हणता पण तुमच्यासकट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सगळ्याच लहानमोठ्या नेत्यांचे प्रचारातील भाषण मोदींवर टीका केल्याशिवाय संपतच नाही.
उत्तर : नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे हा राजकीय धोरणाचा भाग आहे. यापूर्वी भाजपने कधीही वाजपेयी किंवा अडवाणींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले नव्हते. त्यामुळे त्यावेळी त्यांच्यावर टीका करायचा प्रश्न नव्हता. आता मोदींचे नाव आलेय म्हणून टीका केली जातेय. त्याशिवाय दुसरं काही नाही.