आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Agriculture, Divya Marathi

शेतमालाचे भाव कमी होऊ देणार नाही : पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी - गोरगरीब व सर्वसामान्य जनतेसाठी कधी सत्तेत तर कधी विरोधात राहून काम करण्यास मिळाले. मला कधीही सुटी मिळत नाही. कायम थकबाकीदार ही पदवी मिळालेला, जगाचा पोशिंदा शेतकरीवर्ग सुधारला पाहिजे यासाठी आपण सत्तर हजार कोटी रुपये कर्जमाफी दिली. व्याजाचा दर 4 टक्क्यांवर आणला, 16 रुपये दराने गहू खरेदी करून 2 रुपये किलोने देण्याची अन्न सुरक्षा योजना, राजीव गांधी जीवनदायी योजना यासारख्या अनेक योजना लोकशाही आघाडी सरकारने आणल्या तसेच जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत शेतमालाचे भाव कमी होऊ देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही शरद पवारांनी दिली. परभणी मतदारसंघातील राष्‍ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ घनसावंगी येथे आयोजित सभेत ते बोलत होते.


याप्रसंगी मंचावर खासदार गणेश दुधगावकर, पालकमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री फौजिया खान, आमदार सुरेश जेथलिया, चंद्रकांत दानवे, विक्रम काळे, बाबाजानी दुर्राणी, माजी खासदार अंकुशराव टोपे, तुकाराम रेंगे, उमेदवार विजय भांबळे आदींची उपस्थिती होती.


गेल्या निवडणुकीत राष्‍ट्रवादीची मदत : दुधगावकर
गेल्या वेळी निवडणुकीत आपल्याला राष्‍ट्रवादीच्याच नेत्यांनी मदत केल्याचा गौप्यस्फोट खासदार दुधगावकर यांनी केला. नुकतेच शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले परभणीचे खासदार गणेश दुधगावकर यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ उडाली आहे.


...अन् पवार खळखळून हसले
सेनेतून राष्‍ट्रवादीत आलेले खासदार गणेश दुधगावकर यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली. मातोश्रीचा आदेश काय असतो, तर एखाद्या लग्नाला जाऊ नका, कुणाकडे जेवायला जाऊ नका, असा आदेश दिला जातो. हे सांगताना दुधगावकरांनी मार्मिक भाषा वापरली. त्यांचे हे भाषण सुरू असताना पवार यांनी त्यांना खळखळून हसत दाद दिली.


क्षणचित्रे
० सकाळी 11.25 वाजता शरद पवार यांचे येथे आगमन झाले, त्यानंतर सायंकाळी चार वाजेपर्यंत ते घनसावंगी येथे तळ ठोकून होते.
०जवळपास साडेचार तासांच्या दौ-यात पवार यांनी सभेपूर्वी कार्यकर्ते व पदाधिका-यांशी चर्चा केली.
०सभेच्या ठिकाणी बसण्यावरून राष्‍ट्रवादी कार्यकर्ते व पोलिस यांच्यात वाद झाला. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला. मात्र, काही लोकांनी मध्यस्थी केल्याने वाद थांबला व वातावरण शांत झाले.