आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषिप्रधान वर्गाच्या क्षमतांचा विकास साधणारे शिक्षण हवे, शरद पवारांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - कृषिप्रधान वर्गाच्या क्षमतांचा विकास साधणाऱ्या शिक्षणाची गरज आहे, ज्यामुळे नवीन संसाधन-संपत्ती निर्मितीचे मार्ग उपलब्ध होतील, असे मत  माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार यांनी  येथे व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या १९ व्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव होते. विद्यापीठाच्या वतीने  पवार यांना राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांच्या हस्ते मानद डी. लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले.  
 
विद्यापीठाच्या  प्रांगणात समारंभ झाला. मंचावर कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री अर्जुन खोतकर, प्र-कुलगुरू डॅा. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव बी. बी. पाटील, विद्यापीठाचे मुख्य परीक्षा नियंत्रक डॉ. रवी सरोदे यांच्यासह व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, अधिसभा तसेच विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता यांची उपस्थिती होती.  
 
दीक्षांत भाषणात पवार यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उभारणीतील महत्त्वपूर्ण टप्प्यांचा आवर्जून आढावा घेतला. स्वामी रामानंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्तिसंग्रामातील योगदान आणि त्यांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन गौरवाने नमूद केला. मराठवाड्याविषयीची आस्था स्पष्ट करून ते म्हणाले की, शेतीवरचं अवलंबित्व कमी करण्याचा माझा आग्रह आहे. ज्या ठिकाणी शेतीवरचा वर्ग अन्य क्षेत्रात गेला, तेथे परिस्थिती बदलली. त्यामुळे इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका, कॅनडासारखे देश प्रगत दिसताहेत. याउलट शेतीवर अधिक लोकसंख्या अवलंबून राहिल्याने इंडोनेशिया, श्रीलंका, बांगलादेश यांच्यासह भारतात बेरोजगारी, दारिद्र्य पाहायला मिळते. शेतीचे तुकडे, निसर्गावरील अवलंबित्व आणि वाढती लोकसंख्या यामुळे शेतीवर अधिक बोजा आहे. तो कमी करण्यासाठी कृषिप्रधान वर्गाला शिक्षण देण्याची गरज आहे. त्या शिक्षित वर्गातून नवीन संसाधन आणि संपत्ती निर्मितीचे मार्ग उपलब्ध करून देण्याची आज गरज आहे. ग्रामीण भागात ज्या शेतकऱ्याच्या घरात शिक्षण वाढले, त्या कुटुंबात सुबत्ता आल्याचा अनुभव आहे. 
 
या वेळी पवार यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वाटचालीचा आणि विद्यापीठातील विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचाही कौतुकाने उल्लेख केला. तसेच पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून विद्यापीठाकडे पन्नास लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले. या निधीतून महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, सहकारमहर्षी शामराव कदम, तसेच पवार यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांच्या नावाने पुढील शैक्षणिक वर्षापासून किमान दहा जणांना शिष्यवृत्ती देण्यात यावी. यात किमान आठ विद्यार्थी ग्रामीण भागातील आणि त्यापैकी दोन विद्यार्थिनी असाव्यात, असे त्यांनी सांगितले.  तत्पूर्वी राज्यपाल  विद्यासागर राव यांनी कुलपती म्हणून विविध विद्याशाखांतील स्नातकांना पदवी प्रदान केल्याची घोषणा केली. तसेच दीक्षांत समारंभाच्या प्रथेप्रमाणे संदेशही दिला. 

शिक्षणासाठी आग्रही राहा
मराठवाडा हा प्रदेश कृषीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांचा प्रदेश आहे. त्यामुळे इथल्या तरुणांनी शिक्षणाविषयी आग्रही राहायला हवे. शिक्षणच त्यांना तारू शकते. आपल्या देशातील तरुणांची लोकसंख्या ही आपली ताकद आहे. हे ओळखून, त्याला शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. शिक्षणाच्या माध्यमातून होणारी प्रगती स्थायी आणि प्रगल्भ असते हे लक्षात घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.    
 
बातम्या आणखी आहेत...