आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साहित्य आंतरिक हुंकार, जगण्याला बळ पुरवणारी ऊर्जा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - साहित्य हा आंतरिक हुंकार असतो. जगण्याला बळ पुरवणारी ती नैतिक ऊर्जाही असते. त्यामुळे सकारात्मक साहित्य निर्मितीसह शिक्षकांनी वाचनाची आवड जोपासावी, असे आवाहन आमदार दिलीपराव देशमुख यांनी रविवारी केले.

शिक्षक प्रतिनिधी सभा (शिक्षक काँग्रेस), मराठवाडा साहित्य परिषद व संस्थाचालक संघटनेच्या वतीने दुसर्‍या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शिवराज नाकाडे होते. झेडपी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, स्वागताध्यक्ष कल्याण पाटील, रामकृष्ण महाराज भिंगोलीकर, शिक्षक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कालिदास माने, रामदास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार देशमुख म्हणाले, शिक्षक व साहित्याचा अविभाज्य संबंध आहे. रामायणाची निर्मिती करणारे वाल्मीकी, महाभारतकार व्यास, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर हे शिक्षकच होते. त्यांच्या साहित्याने जगणे समृद्ध केले. पुस्तकांच्या संख्येवर वा त्याच्या जाडीवर साहित्य व साहित्यिकाचे मूल्यमापन होऊ शकत नाही, तर त्यातून उमटलेल्या आशयाची उपयुक्तताच त्याचे मूल्यमापन करत असते. नीतिमूल्यांचे भरण पोषण करणारी अन् जगण्याबाबत सकारात्मक मानसिकता तयार करणार्‍या साहित्याची आज गरज आहे.

शिक्षकांच्या माध्यमातून हे कार्य अधिक प्रभावीपणे होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षकांचे चिंतन कमी झाल्यामुळे चिंता वाढल्या. मूळ साहित्य बाजूला ठेवून दुसर्‍या साहित्याकडे शिक्षक वळल्याने त्यांच्या चिंतेत भर पडल्याची मार्मिक टिप्पणीही त्यांनी या वेळी केली. वर्षातून किमान चांगली बारा पुस्तके वाचा, असा सल्लाही त्यांनी शिक्षकांना दिला. डॉ. शिवराज नाकाडे यांनी समाजाला दिशा देण्याचे कार्य शिक्षक करतात, असे सांगितले. चांगले साहित्य हे जगण्याची संजीवनी असते. सत्य, शिव व सुंदरतेचे ते दर्शन असते. अशा साहित्याने जीवनाला चांगले वळण लागते अन् वाईट प्रवृत्तीही मनातून हद्दपार करण्यास हे साहित्य मदत करते. पैसा खर्चून समाजनिर्मिती होत नाही, तर त्यासाठी सर्वस्तरांतून हृदयाला हात घालणारा ध्येयवाद लागतो व तो शिक्षकाच्या लिखाणात असतो, असेही ते म्हणाले.