आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिंगोली तलाव बुजविण्याचा घाट; अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - 1972 मध्ये 5 ते 6 एकरवर उभारण्यात आलेल्या तलावाचे भूखंडासाठी अस्तित्व संपविण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे गावकर्‍यांनी तीव्र विरोध केला असून, तलाव अबाधित रहावा, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील शिंगोली येथील या प्रकाराची जिल्हाधिकार्‍यांनीही गंभीर दखल घेतली आहे.
शिंगोली गावालगत सर्किट हाऊसच्या पाठीमागील भागात गट क्रमांक 93, 94, 95 मधील काही क्षेत्र सिलिंग जमिनीमधील आहे. त्यामध्ये 5 ते 6 एकरवर एक तलाव बांधण्यात आला आहे. 1972 मध्ये बांधण्यात आलेल्या या तलावामध्ये मुबलक प्रमाणात पाणी आहे. हे पाणी गावातील जनावरांसाठी उपयोगी पडते. वर्षानुवर्षे जनावरांची त्याद्वारे सोय होते. मात्र, काहीजण या तलावाचे अस्तित्व संपवून त्याजागी एन-ए, ले-आऊट करून प्लॉट पाडत आहेत. तलाव बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. शिंगोलीतील शेतकर्‍यांनी अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर संबंधित जागेचा तलाठ्यामार्फत पंचनामा करण्यात आला. जमिनीचे अकृषी करून भूखंड पाडण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळताच ग्रामपंचायतीने याबाबत 21 जून रोजी ठराव घेतला असून, या ठरावाची प्रत जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आली आहे. गट क्रमांक 94 मध्ये 1972 मध्ये तलाव बांधण्यात आला असून, हा तलाव नष्ट करून त्याठिकाणी प्लॉटिंग पाडण्याची कार्यवाही तत्काळ बंद करावी, सदरील तलाव जिल्हा परिषदेने ताब्यात घ्यावा, त्याची दुरुस्ती करून जनावरांच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी या ठरावाद्वारे केली आहे.

तलावाची नोंद सापडेना
गावकर्‍यांच्या सांगण्यानुसार हा तलाव 1972 मध्ये बांधण्यात आला असून, त्याची नोंद मात्र पाटबंधारे विभागाच्या कुठल्याही सरकारी कार्यालयात आढळत नाही. विशेष म्हणजे संबंधित शेतकर्‍यांच्या सातबारावरही तलावाची नोंद नाही. त्यामुळे महसूल विभागासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र, जिल्हा परिषदेने या तलावात मच्छेमारी करण्याचा 5 वर्षे ठेका दिला होता.
गावकरी आंदोलन करणार
तलावासाठी संपादित झालेल्या जमिनीचा संबंधित श्ोतकर्‍यांना मावेजा मिळाला नसेल तर तो मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करून गावकर्‍यांनी कुठल्याही परिस्थितीत तलाव नष्ट न करण्याची मागणी केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
तलावाचे अकृषी झाले
शिंगोली येथील तलावाचे अकृषी करून आराखडा मंजूर करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी पाणी असलेल्या तलावाचे अकृषी (एनए) मंजूर कसे केले, असा प्रश्न गावकर्‍यांना पडला आहे.
तलावाचे सपाटीकरण करून त्याठिकाणी प्लॉटिंग पाडण्याचा प्रकार हाणून पाडला आहे. मात्र, तलावाच्या जमिनीचे अकृषी कसे मंजूर केले, त्यात काही महसूलच्या अधिकार्‍यांचाही हात आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करावी.’’
पाशुमियाँ शेख, तालुकाध्यक्ष, मनसे.