शिऊर- येथील 33 केव्ही उपकेंद्रांतर्गत येणार्या सत्तावीस गावांचा कारभार केवळ सात कर्मचार्यांच्या हाती असून त्यांच्यावरील अतिरिक्त कामाच्या भारामुळे वीज वितरणाचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे सतत वीजपुरवठा खंडित होणे, बिघडलेले रोहित्र वेळेवर दुरुस्त न होणे अशा अनेक कारणांमुळे अखंडित वीज मिळत नसल्याने वीजग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सत्तावीस गावे मिळून साधारण तीस हजार ग्राहकसंख्या असलेल्या शिऊर महावितरण कार्यालयांतर्गत वीजपुरवठय़ाचे नियोजन ढेपाळले आहे. छोट्याशा वादळीवार्यामुळे दोन तासांपासून ते दोन दिवसांपर्यंत वीज गुल होते. वीजपुरवठा पूर्ववत होण्यास कर्मचार्यांअभावी मोठा विलंब होतो. परिणामी, ग्राहकांना नियोजित भारनियमनाव्यतिरिक्त जास्तीच्या भारनियमनाचा भार सहन करावा लागतो आहे. महावितरणच्या प्रशासकीय यंत्रणेत बेजबाबदार आणि भोंगळ कारभार सुरू आहे हे यावरून स्पष्ट होते.
पाठपुरावा सुरू
सलग वीजपुरवठा व्हावा यासाठी या उपकें द्रावर पाच कर्मचार्यांची मागणी वरिष्ठांकडे केली आहे व दर मासिक बैठकीस त्याचा पाठपुरावा होत आहे आणि कर्मचारी देण्याचेही सहायक अभियंता भास्कर कोळे यांनी आश्वासन दिले आहे, ते मिळाल्यास नक्कीच शिऊरची मोठी अडचण दूर होईल.
- के. व्ही. कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता शिऊर
शिऊर कार्यालयांतर्गत येणारी गावे
सफियाबादवाडी, हाजीपूरवाडी, बंगला, कोल्ही, भादली, आचलगाव, जिरी, बोलठाण, सावखेडा, रघुनाथपूरवाडी, सुदामवाडी, लोणी खुर्द, निमगाव, गोंदगाव, बाकला, टुणकी, बळ्हेगाव, पिंपळगाव, साकेगाव, मनेगाव, कोरडगाव, वडजी आलापूरवाडी आदी वाड्यावस्त्यांचा समावेश आहे.