आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘शिवार संवाद अभियाना’स होणार प्रारंभ, संघर्ष यात्रेला प्रत्युत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला प्रत्युत्तर म्हणून राज्यात भाजपकडून संवाद यात्रा काढण्यात येणार होती. मात्र, तिला सुरुवात होण्याआधीच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या ‘साला’ या शब्दामुळे शेतकरी दुखावले असल्याचे पाहून आता  ‘शिवार संवाद अभियान’ नावाने ही यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून गुरुवारी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातून त्याचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.
 
सरकारने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती त्यांच्या बांधावर जाऊन देणे अशी ही प्राथमिक संकल्पना आहे. मात्र, ती मंत्री, आमदारांच्या माध्यमातून राबवणार की सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  
 
गेल्या महिन्यात उन्हाच्या तीव्र झळा असतानाही काँग्रेस-राष्ट्रवादी या विरोधकांनी एकत्र येऊन राज्यात संघर्ष यात्रा काढली. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई अशा तीन टप्प्यांत काढलेल्या या संघर्ष यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने संवाद यात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघणार होती. त्याची तयारी पूर्ण झाली असतानाच जालन्यात रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना ‘साला’ शब्द उच्चारला.
 
तो शेतकऱ्यांसंबंधीच असल्याचे सांगत विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. दुसरीकडे सोशल मीडियातूनही रावसाहेब दानवे आणि पर्यायाने भाजपची नाचक्की झाली. त्या परिस्थितीत शेतकऱ्यांशी संवाद यात्रा काढणे धोक्याचे ठरू शकते हे ओळखून भाजपने ही ‘शिवार संवाद अभियान’ या नावाने सुरू करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्याची कल्पना देण्यात आली. त्याचा प्रारंभ गुरुवारी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातून करण्याचे नियोजन आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत  हा संवाद हाेणार असल्याने साऱ्यांनाच या बाबतची उत्सूकता असून, साऱ्यांचे लक्ष याकडे लागले अाहे.

काय आहे शिवार संवाद अभियान  
शेतकऱ्यांशी त्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधायचा. राज्य सरकारच्या वतीने शेती आणि शेतकऱ्यांच्या अनुषंगाने सुरू केलेल्या नव्या योजना, त्यांची अंमलबजावणी व त्याचे परिणाम समजावून सांगायचे, असा या अभियानाचा मुख्य हेतू आहे.
 
मात्र, दोन दिवसांपूर्वीच याबाबतचा निर्णय झाल्यामुळे हे पक्षस्तरावरचे अभियान आहे की सरकारी पातळीवरचे याबाबत स्पष्टता नाही. मुख्यमंत्री स्वत: निलंगा तालुक्यातील हलगरा येथे गुरुवारी सकाळी ६ वाजता श्रमदान करणार असून तेथेच उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत, असे सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...