आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा विवाह सोहळा: दुष्काळाचा एकजुटीने सामना करू; उद्धव ठाकरे यांची ग्वाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - सकाळी नऊ वाजल्यापासूनच शहराचे सर्वच रस्ते जिंतूर रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर वऱ्हाडींच्या गर्दीने फुलून गेले होते. दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांचा सामूहिक विवाह सोहळा असताना बारा वाजताच १० एकरांवरील तो सभामंडप खचाखच भरून गेला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच बौद्ध व हिंदू धर्म पद्धतीचा हा विवाह सोहळा झाला. ३३३ जोडप्यांचे शुभमंगल लाखोंच्या साक्षीने विधिवत पद्धतीने झाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेचा राज्यातील पहिला सामुदायिक विवाह सोहळा रविवारी येथील नूतन विद्या मंदिरच्या मैदानावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. या सोहळ्यासाठी मागील दोन महिन्यांपासून शिवसेनेच्या स्थानिक नेतेमंडळींनी जोरदार तयारी चालवली होती. तब्बल ३३३ नववर-वधूंची नोंदणी झाल्याने हा सोहळा ऐतिहासिक ठरला. मंचावर पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते, जिल्हा संपर्कप्रमुख आ.सुभाष भोईर, खा.चंद्रकांत खैरे, खा.संजय ऊर्फ बंडू जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, जयप्रकाश मुंदडा, मोहन फड तसेच महापौर संगीता वडकर, उपमहापौर भगवान वाघमारे, भाजपचे नेते अॅड. विजय गव्हाणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ. संजय कच्छवे, माजी आ.मीरा रेंगे, माजी आ.हरिभाऊ लहाने, माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे, संदीप भंडारी, सुधाकर खराटे, मनपाचे गटनेते अतुल सरोदे, प्रभाकर वाघीकर, अच्युत महाराज दस्तापूरकर आदींची उपस्थिती होती. खा.संजय जाधव यांनी परभणीकरांचे शिवसेनेवरील प्रेम सांगताना हा अभूतपूर्व असा सोहळा जनतेच्या प्रेमानेच यशस्वीरीत्या होत असल्याचे सांगितले.
या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, जिल्हा संपर्कप्रमुख सुभाष भोईर यांच्या मनोगतानंतर प्रारंभी बौद्ध समाजातील वधू-वरांचा व त्यानंतर हिंदू समाजातील वधू-वरांचा पाच मंगलाष्टकांसह विधिवत पद्धतीने विवाह लावण्यात आला. पक्षप्रमुख ठाकरे यांनी विवाहप्रसंगी त्यांच्यात उभे राहून आशीर्वाद दिले.
शुभमंगलप्रसंगी दुष्काळावर, शेतकरी आत्महत्यांवर, त्या कशा होतात, यावर बोलायचे नाही. परंतु सातत्याने येत असलेल्या या दुष्काळावर मात करण्यासाठी शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी आहे व राहील, असाही विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिला.
लाखोंच्या जेवणावळी
१० एकरांवरील भव्य सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना पुरुष व महिलांसाठी जेवणाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. हजारो कार्यकर्ते वाढप्याच्या रूपात काम करीत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेवणावळी, त्याही अतिशय व्यवस्थितरीत्या पार पडल्याचे अनेकांनी यावेळी बोलून दाखविले.
राजकीय भाष्य करण्याचे टाळलेे
३३३ जोडप्यांच्या विवाहासाठी दाखल झालेल्या लाखो वऱ्हाडींच्या उपस्थितीत आपल्या साडेचार मिनिटांच्या मनोगतात ठाकरे यांनी प्रारंभीच हा मंगल सोहळा असल्याचे स्पष्ट करताना राजकीय भाष्य करण्याचे टाळले. संकटे येतात-जातात, शेतकरी बंधूंनो, आत्महत्येचा विचार करू नका. कुटुंब उघड्यावर पडते, त्यांच्या पाठीशी कोणीही नसते, असे आवाहन करताना संकटांचा मुकाबला सर्व मिळून करू, अशी ग्वाही दिली. तेम्हणाले, निवडणुकांत आम्ही तुमच्याकडे येतो. तुम्ही इकडे, तिकडे मतदान करता. परंतु मतदान झाल्यानंतर तुमची आमची ओळखच नसते. ही चौकट मोडीत काढण्याचे काम शिवसेनेने केले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सामुहिक विवाह सोहळ्याचा फोटो..