आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरायांचे स्मारक जगात एकमेवाद्वितीय असेल, मेटेंची ग्वाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - अरबी समुद्रात उभारण्यात येणारे छत्रपती शिवरायांचे स्मारक देशातच नाही, तर जगात
एकमेव स्मारक असेल. यासाठी आमदार, माथाडी नेते, उद्योजकांनी निधी देण्याची तयारी दाखवली आहे. केंद्र सरकारही निधी देईल; परंतु राज्य छत्रपतींच्या नावाने चालते. त्यांच्या नावाने आम्ही निवडणुका जिंकल्या. शिवरायांच्या स्मारकासाठी कितीही पैसे लागले तरी राज्य सरकार डगमगणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

मेटे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मंत्रालयात समितीची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या हस्ते १९ फेब्रुवारीला स्मारकाचे भूमिपूजन आपण करू शकतो का? त्यानुषंगाने कोणत्या बाबी झाल्या? केंद्र, राज्य सरकार, महानगरपालिकेच्या कोणकोणत्या परवानग्या मिळाल्या याचा आढावा घेण्यात आला. हा प्रकल्प मोठा असल्याने एखादी सल्लागार एजन्सी नेमणे, त्यानंतर निविदा काढण्यात येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती नियुक्त करतानाच स्वतंत्र कार्यालय, कर्मचारी, अधिकारी आठ दिवसांत नियुक्त करण्याचे ठरवले. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे केंद्रीय पर्यावरण खात्याची परवानगी मिळाली. केंद्रीय पर्यावरण खात्याची अधिसूचना निघाली असून १० फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. त्यानंतर नागरी विमान सेवा खात्याची परवानगी आठ दिवसांत मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १९ फेब्रुवारीला भूमिपूजन करण्याची तयारी पूर्ण होते का? याचा अंदाज तोपर्यंत येईल, असे मेटे यांनी स्पष्ट केले.

एजन्सी नियुक्त केल्यानंतर स्मारकाचा आराखडा
शिवरायांचे स्मारक जगभरात सर्वश्रेष्ठ असेल, यासाठी सल्लागार एजन्सी नियुक्त केल्यानंतर स्मारकाचा कच्चा आराखडा तयार होईल. यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या सूचना घेऊन आराखडा तयार होईल. त्यानुसार प्रकल्पीय किंमत निश्चित केली जाईल. केंद्र सरकार निधी देईल वा नाही; परंतु अनेक आमदारांनी निधी देऊ केलाय. याशिवाय राज्यातील माथाडी कामगारांचे नेते, उद्योगपतींनी निधी द्यायची तयारी केली आहे. परंतु, शिवरायांच्या नावाने चालणारे युती सरकार पैसा कमी पडू देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले.

फेब्रुवारीत समितीची बैठक
समितीची पुढची बैठक फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात मंत्रालयात होणार आहे.
तोपर्यंत समितीचे स्वतंत्र कार्यालय, कर्मचारी, अधिकारी नियुक्त झालेले असतील.
विनायक मेटे, अध्यक्ष, शिवस्मारक समिती