आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivraj Patil Chakukar Today Retired As Punjab Governor

शिवराज पाटील चाकूरकर आज पंजाबच्या राज्यपाल पदावरून होणार निवृत्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - सलग सात वेळा लातूरचे खासदार राहिलेले ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर बुधवारी पंजाबच्या राज्यपाल पदावरून निवृत्त होत आहेत. आपल्या पन्नास वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत अपवाद वगळता कायम सत्तेत राहणा-या चाकूरकरांनी स्वत:ची निष्कलंक प्रतिमा प्राणपणाने जपली आहे. त्यामुळेच देशात भाजपचे सरकार आल्यानंतर काही काँग्रेसी नेत्यांना रात्रीतून राज्यपालपद सोडावे लागले असले तरी शिवराज पाटील चाकूरकर मात्र मुदत संपेपर्यंत सन्मानाने या पदावर राहिले, हे त्यांचे वेगळेपण आहे.

शिवराज पाटील चाकूरकर यांनी सन १९६५ मध्ये आपल्या राजकारणाची सुरुवात केली. १९६७ मध्ये ते लातूर नगर परिषदेचे अध्यक्ष झाले. पुढे १९७२ मध्ये लातूरचे आमदार म्हणून ते निवडून आले. काही काळ त्यांनी राज्य विधिमंडळाचे सभापती म्हणून काम पाहिले आणि १९८० मध्ये ते लातूरचे खासदार झाले. सलग सात वेळा या मतदारसंघातून निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. या काळात त्यांनी केंद्रात विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, अंतराळ संशोधन, संरक्षण, वाणिज्य अशा विविध खात्यांचे मंत्रिपद सांभाळले. १९९० मध्ये ते लोकसभेचे सभापती झाले. २००४ मध्ये यूपीएच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांचा लातूरमधून पराभव झाला असला तरी त्यांना केंद्रात गृह खात्याचे मंत्रिपद मिळाले. या सगळ्या सत्तेच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीवर डाग पडू दिला नाही.
गृहमंत्री असताना त्यांना मीडिया ट्रायलमुळे हे खाते सोडावे लागले. मात्र, त्यांनी कधीही त्याचा राग आपल्या मनात ठेवला नाही. उलट आपल्या भाषणांमधून याचा कायम खुमासदार उल्लेख ते करतात. यूपीए दोनच्या काळात त्यांना पंजाबच्या राज्यपालपदी नेमण्यात आले. गेल्यावर्षी काँग्रेसचा पराभव होऊन भाजपचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर अनेक काँग्रेसी राज्यपालांच्या मध्यरात्री बदल्या झाल्या आणि त्यांना अवमानास्पद पद्धतीने राजीनामे द्यावे लागले. मात्र, भाजपच्या गोटातून राज्यपाल बदलण्याच्या यादीत कधीच शिवराज पाटलांचे नाव आले नाही. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतर ते कायम ‘नो कॉमेंट्स’ एवढेच उत्तर द्यायचे. मात्र, त्यांच्या कामाची पद्धत, सर्वपक्षीयांमध्ये असलेल्या त्यांच्याबद्दलचा आदर यामुळे कदाचित भाजप सरकारनेही त्यांना मुदत संपेपर्यंत पदावर कायम ठेवण्याचे औदार्य दाखवले, हे शिवराज पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण म्हणावे लागेल.

पक्षात सक्रिय होणार
८० वर्षांच्या चाकूरकरांनी ५० वर्षे राजकारणात घालवली. भविष्यात ते दिल्लीतच राहणार असून काँग्रेसच्या वरिष्ठ नेेतेमंडळींत त्यांचा समावेश असेल. सध्या काँग्रेस ज्या अवस्थेतून जात आहे ते पाहता पक्षाला तरुण नेतृत्वाबरोबरच संयमी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाचीही गरज आहे. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाल्यापासून पक्षात निर्माण झालेली पोकळी त्यांच्या माध्यमातून भरून निघू शकते.

दिल्लीत राहिलो तरी मी लातूरकरच : चाकूरकर
खासदार झाल्यापासून मी कायम दिल्लीत राहत आलोय. निवृत्तीनंतरही वास्तव्याचे ठिकाण दिल्लीच असेल. कामासाठी लातूर-मुंबईला जात-येत राहीन. मात्र, मी स्वत:ला कायम लातूरकरच मानत आलो असून पुढेही एक लातूरकरच असेन. लातूर माझी कर्मभूमी आहे. नगर परिषदेचा सदस्य, आमदार, खासदार ही पदे लातूरमधून मिळाली. तेथे घर, शेती, नातेवाईक, मित्र आहेत. त्यांना विसरणे शक्य नाही. त्यामुळे लातूर सोडले असे होणार नाही. जिथे गरज असेल तिथे मी नक्की असेन, असे सांगत शिवराज पाटील यांनी लातूरप्रती भावना व्यक्त केल्या.