आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीच्या पाण्यासाठी शिवसैनिकांचा रास्ता रोको

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - जायकवाडी प्रकल्पाला पाण्याचा समान वाटा मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी (दि. 22) सकाळी अकरा ते एक या वेळेत येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राज्यातील आघाडी सरकारचा निषेध नोंदवत पश्चिम महाराष्ट्राची पाण्याच्या बाबतीत होणारी दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा या वेळी देण्यात आला. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली. यामुळे शहराच्या मुख्य मार्गावरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती. भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही आंदोलनात सहभाग नोंदवला.

जायकवाडीला समान वाटा मिळण्यासाठी मूळ कायदा 12 (सहा) ग नुसार राज्य सरकारने अंमलबजावणी करावी, असे निर्देश असताना राज्यातील आघाडी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप या वेळी करण्यात आला. जायकवाडीच्या वरील भागात मंजूर पाणी वापरापेक्षा अधिक वापराची अनेक लहान-मोठी धरणे बांधून खो-यातील सर्व पाणी वरील भागात अडवले गेल्यामुळे जायकवाडी प्रकल्पाला त्याचे निर्धारित पाणी न मिळून ते भरेनासे झाले आहे. राज्य शासनाने 2005 मध्ये जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा कलम 12 (सहा) ग मध्ये नदीखो-यातील पाणीवाटप तरतुदीनुसार खो-यातील पाण्याची तूट समप्रमाणात विभागली जावी व सर्व धरणांना समान पाणी वाटप करण्यात यावे, अशी मूळ कायद्यात तरतूद असताना आघाडी सरकारने या कायद्याची अंमलबजावणी न केल्याने जायकवाडी प्रकल्पात पाणीसाठा निर्माण होत नसल्याने मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यातील शेतक-यांवर व जनतेवर पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ शकते, असे शिवसेनेने म्हटले. आमदार संजय जाधव यांच्या पुढाकाराने झालेल्या या आंदोलनात भाजपचे प्रदेश चिटणीस अ‍ॅड.विजय गव्हाणे, जिल्हाप्रमुख सुधाकर खराटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, पंढरीनाथ घुले, जिल्हा परिषदेचे सभापती गणेशराव रोकडे, नगरसेवक उदय देशमुख, व्यापारी संघटनेचे भगवानराव शेळके यांनी विचार मांडले. सूत्रसंचालन संदीप भंडारी यांनी केले, तर मनपाचे गटनेते अतुल सरोदे यांनी आभार मानले. त्यानंतर जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. आंदोलनात उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे, शहरप्रमुख रामप्रसाद रणेर, संजय सारणीकर, दिलीप अवचार आदी सहभागी झाले होते.