आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना-भाजप एकत्र येणार, राष्ट्रवादी विरोधी बाकावर..! उस्मानाबादेत राजकारण रंगणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - सत्तापरिवर्तनाची नांदी आल्याने कुणी सत्तेबाहेर, तर कुणी सत्तेत गेले आहेत. उस्मानाबादेत कालपर्यंत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला आता विरोधी बाकावर बसावे लागण्याची दाट शक्यता आहे. संख्याबळ अधिक असले तरी शिवसेना-भाजप एकत्र येऊन सत्तेच्या संपूर्ण चाव्या स्वत:कडे ठेवण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीकडे १७ नगरसेवक असून सेनेकडे ११, तर भाजपकडे ८ सदस्य आहेत. त्यामुळे सेना-भाजपने एकत्र येण्याची तयारी केली असून उपनगराध्यक्षपद सेनेकडे, तर भाजपला काही सभापतिपदे दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले .

२००१ च्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उस्मानाबाद पालिकेवर काँग्रेसच्या डॉ. ऊर्मिलाताई गजेंद्रगडकर निवडून आल्या होत्या. त्यानंतर २००६ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. सदस्यसंख्या अधिक, त्याच पक्षाची सत्ता, असे समीकरण होते. या वेळीही सदस्यसंख्येनुसार निवड असती तर राष्ट्रवादीकडेच सत्ता राहिली असती. मात्र, थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याच्या नव्या निर्णयामुळे राष्ट्रवादीची काहीशी अडचण झाली आहे. शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आल्याने तसेच सदस्यांची संख्या ४ वरून थेट ११ वर गेल्याने सेनेला बळ मिळाले आहे. शून्यावर असलेल्या भाजपमध्येही हत्तीचे बळ आले आहे. भाजपच्या ८ सदस्यांनी एकाच वेळी पालिकेत एंट्री केली आहे. राज्यस्तरावरील नेत्यांनी भाजप-सेनेची युती झाल्याचे निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते. मात्र, स्थानिक स्तरावर युतीसाठी विशेष प्रयत्नही झाले नाहीत, शिवाय दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते युतीसाठी फारसे अनुकूल नसल्याचे दिसून येत होते. मात्र, त्याचा भाजपला विशेष फायदा झाला आहे. उस्मानाबाद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपची थोडक्यात हार झाली असली तरी सर्वांनाच चकित करायला लावणारी मते घेत येणाऱ्या काळात भाजप सत्तेत असेल, याचे भान निर्माण करून दिले आहे.

निवडणुकीनंतर युतीच्या दोन्ही पक्षांना आशादायक चित्र वाटू लागल्याने उभय पक्ष आता एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही पक्षांची सदस्यसंख्या १९ होते. म्हणजे राष्ट्रवादीपेक्षा दोन सदस्यसंख्या अधिक होत असल्याने उपनगराध्यक्षासह खालची सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांना एकत्र यावे लागणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू झाले आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांचा मंगळवारी मुंबईत ‘मातोश्री’वर सत्कार झाला. या वेळी काही पदाधिकाऱ्यांनी सेनेच्या वरिष्ठ नेत्यांना निकालानंतर भाजपसोबत युती करण्याची परवानगी मागितल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्तेपासून अधिक दूर ठेवण्याचे दोन्ही पक्षांचे प्रयत्न सफल होतील, अशी शक्यता आहे. दरम्यान, पालिकेवरील सत्तेमुळे शहरात शिवसेनेचा प्रभाव वाढू शकतो. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराला होईल, शिवाय राष्ट्रवादीसह काँग्रेसला तोटा होईल. मात्र, पराभवानंतर दोन्ही काँग्रेसचे नेते शहरावर विशेष लक्ष केंद्रित करतील, त्यामुळे तत्कालीन स्थिती कदाचित वेगळी असू शकते.
शासनाच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलण्याची अपेक्षा, भाजपकडेही आहे विकासाची ब्ल्यूप्रिंट
भाजपला उस्मानाबाद पालिकेच्या सत्तेत एकहाती सहभागी होता आले नसले तरी ८ नगरसेवकांच्या माध्यमातून सत्तेत सहभागी होऊन विकासाचा आराखडा उलगडण्याची संधी आहे. भाजपचे नितीन काळे आणि त्यांच्या टीमकडे विकासाची ब्ल्यूप्रिंट असून, त्यांच्या व्हिजनचाही पालिकेला पर्यायाने शहराला फायदा होऊ शकतो. भोगावती नदीचे सौंदर्यीकरण, भुयारी गटार योजना, चोवीस तास पिण्याचे पाणी, शहरी आरोग्य केंद्र, सार्वजनिक सुलभ शौचालय, मजबूत रस्ते, नाल्यांचे पद्धतशीर नियोजन, अशा मूलभूत सुविधांचीही शहराला गरज आहे.
विरोधातला आवाज तीव्र
राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसवण्यात सेना-भाजप यशस्वी झाले तर राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच्या सदस्यांचा आवाज अधिक तीव्र स्वरूपाचा असेल. कारण दोन्ही काँग्रेसमध्ये निवडून आलेले सदस्य अनुभवी असून, काहींनी यापूर्वी पालिकेच्या सभा गाजवलेल्या आहेत. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यास विद्यमान नगराध्यक्षांना काम करताना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
बातम्या आणखी आहेत...