आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातुरातही शिवसेनेला अंतर्गत कलहाचा प्रादुर्भाव..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांतील शिवसेनेमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलहाचा प्रादुर्भाव लातूरच्या शिवसेनेलाही झाला आहे. ग्रामीण जिल्हाप्रमुख असलेल्या सुभाष काटे यांच्याविरुद्ध त्यांच्याच तालुक्यातील माजी पदाधिकार्‍यांनी दंड थोपटले आहेत. उद्धव ठाकरेंच्या आजारपणामुळे हा वाद चंद्रकांत खैरे यांच्या कोर्टात आला. त्यांनी दोघांनाही तूर्त शांत राहण्याचे आदेश देऊन वाद शमवण्याचा प्रयत्न केला आहे.
लातूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख काटे यांची संयमी शिवसैनिक अशी प्रतिमा आहे. सात वर्षांमध्ये त्यांनी त्यांचे सहकारी बालाजी भोसले यांना सोबत घेऊन अनेक आंदोलने केली. मात्र, झेडपीच्या निवडणुकीपासून दोघांमधून विस्तव जाईनासा झाला आहे. मागील महिन्यात काटे यांनी हॉटेल प्रारंभ करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांना निमंत्रित केले. ‘आपण आज जे काही आहोत ते बाबासाहेब पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्यामुळे’, असे वक्तव्य त्या वेळी काटे यांनी जाहीर भाषणात केले. भोसले यांना काटे यांचे हे वक्तव्य खटकले. झेडपीच्या निवडणुकीमध्ये चापोली गटातून निवडणूक लढवलेल्या भोसले यांचा 136 मतांनी पराभव झाला होता. त्या वेळी काटे राष्ट्रवादीच्या प्रचारात गुंग होते, त्यांनी आजवर केवळ काँग्रेस-राष्ट्रवादीशी मॅनेज होण्याचा प्रकार केला आहे, असे भोसले यांचे आरोप आहेत. पंधरा दिवसांपूर्वी भोसले यांनी तक्रारींचा गठ्ठा घेऊन मुंबई गाठली. उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारही केली. मात्र, ठाकरेंच्या आजारपणामुळे त्यावर काहीच निर्णय झाला नाही. पुढे बाळासाहेबही रुग्णालयात दाखल झाल्यामुळे भोसलेंना हात हालवत परतावे लागले. र्शेष्ठींनी हे प्रकरण संपर्क नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडे वर्ग केले. भोसलेंच्या तक्रारीवरून काटे यांना सफाई देण्यासाठी पाचारण करण्यात आले. सध्या बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे तूर्त निर्णय घेता येणार नाही. वाद करू नका. शांत राहा, असा सल्ला चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.
कसलाच वाद नाही - शिवसेनेमध्ये कसलाच वाद नाही. घरात कुरबुर होत असते. याचा अर्थ तेथे वाद आहे, असा होत नाही. बाहेरच्यांनाच तेथे वाद असल्याचे दिसते. पत्रकारच लावालाव्या करतात. त्यामुळे वाद निर्माण होतात. सगळीकडे पत्रकारच वाद असल्याचा आभास निर्माण करीत आहेत. आमच्या घरातले भांडण मिटवण्यास आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत. - खासदार चंद्रकांत खैरे, संपर्क नेते, शिवसेना
काटेंमुळे वाटोळे - सुभाष काटे यांना आम्हीच शिवसेनेत आणले. त्यांच्यामुळे शिवसेना मोठी होईल असे स्वप्न पाहिले. मात्र त्यांनी शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मी उभा असताना त्यांनी मनातून माझा प्रचार केला नाही. त्यामुळे थोडक्यात पराभव झाला. त्याला तेच जबाबदार आहेत. ते राष्ट्रवादीशी मॅनेज असल्यामुळे शिवसेनेचे वाटोळे होत आहे. - बालाजी भोसले, माजी तालुकाप्रमुख, चाकूर
भोसलेंचा गैरसमज - बालाजी भोसले माझे सहकारी होते आणि आहेत. त्यांच्याविरोधात माझी कसलीच तक्रार नाही. त्यांनी माझी तक्रार केली आहे. त्यांचा काही गैरसमज झाला असेल तो दूर करण्यासाठी आपली चर्चा करण्याची तयारी आहे. राष्ट्रवादीशी संबंध नाही. राजकारणात वैचारिक मतभेद असले, तरी राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्याशी वैयक्तिक शत्रुत्व नाही. त्यामुळेच त्यांना कार्यक्रमाला बोलावले होते. याचा अर्थ मी राष्ट्रवादीचा प्रचार करतो, असा होत नाही. - सुभाष काटे, जिल्हाप्रमुख, लातूर ग्रामीण