आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या वेळकाढूपणामुळे शिवसेना स्वबळावर लढणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या जिल्ह्यातील चार नगरपालिका निवडणुकांमध्ये मित्रपक्ष भाजपासोबत युती करण्याची इच्छा होती. मात्र वारंवार संपर्क साधूनही भाजपाकडून वेळकाढूपणा केला जात आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात सेना स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाणार असल्याची घोषणा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी शनिवारी केली.
सावंत म्हणाले की, गेल्या पंधरा दिवसांमध्ये सहसंपर्कप्रमुख बळवंत जाधव, अभय साळुंके, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी लातूर भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला. जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांनी सातत्याने झुलवत ठेवले. भाजपाने लातूरची जबाबदारी संभाजी निलंगेकरांकडे दिल्याचे जाहीर केले होते. मात्र स्थानिक पातळीवर उदगीरमध्ये आमदार सुधाकर भालेराव, अहमदपूरमध्ये दिलीप देशमुख, निलंग्यात अरविंद निलंगेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे निरोप येत आहेत. अशा पद्धतीने शिवसेना कुणाच्या पाठीमागे फरपटत जाणार नाही. त्यामुळे आगामी पालिका निवडणुका एकट्याने लढवण्याचा निर्णय घेतल्याचे संजय सावंत यांनी जाहीर केले. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांच्या पोटनिवडणुकीतही हेच झाले होते. चर्चेला बसल्यानंतर तुमची फार ताकद नाही, ती जागा आमचीच आहे. तेथे आमच्याकडे स्ट्राँग उमेदवार आहे, असे सांगितले आणि काँग्रेसमधून ऐनवेळी उमेदवार आयात करून जागा लढवली. त्या निवडणुकीतील सेना-भाजपाच्या मतांची बेरीज केली तर युतीचा उमेदवार निवडून आला असता. मात्र जाणीवपूर्वक काँग्रेसला मदत होईल अशा पद्धतीने उमेदवार देण्यात आले, असा आरोपही सावंत यांनी केला. दरम्यान, औसा, अहमदपूर, निलंगा आणि उदगीर या चार नगरपालिकांपैकी कोणत्याही दोन जागा भाजपाने लढवाव्यात. नगरसेवकांच्या निम्म्या जागा सेनेकडे तर निम्म्या भाजपाकडे असाव्यात या सूत्रानुसार निवडणूक लढवायची मानसिक तयारी केली होती. मात्र त्याला पक्षपातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. टोलवाटोलवी करण्याच्या भाजपाच्या धोरणाला कंटाळून स्वबळाचा निर्णय घेतल्याचे सावंत यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...