हिंगोली - विधानसभा क्षेत्रात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने वसमत येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बुधवारी शेतकर्यांचा मोर्चा काढण्यात आला, परंतु शेतकर्यांच्या मागणीपेक्षा शिवसेनेने इच्छुक उमेदवाराला या सभेतून लाँच करून माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा गटाला पूर्णपणे डावलण्यात आले. यामुळे शिवसेनेतील गटबाजी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा उफाळणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीपासून मुंदडा आणि वानखेडे यांचे बिनसल्याने शिवसेनेत गटबाजी वाढली. या जागेवर माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा हेसुद्धा आपली उमेदवारी निश्चित समजून कामाला लागले आहेत, तर मुंदडांमुळेच लोकसभेत पराभव झाला असल्याचा आरोप करून वानखेडे गटाने वसमत विधानसभेतून शिवसेनेतर्फे सर्वोच्च न्यायालयातील वकील शिवाजी जाधव यांना समोर केले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारी न मिळाल्याने अॅड. जाधव यांना आयतीच संधी मिळाल्याने त्यांनीही काम सुरू केले असून बुधवारी मोर्चाच्या नावाखाली जाहीर सभाच घेतली. ग्रामीण भागातून शेतकर्यांना मोर्चासाठी आणण्यात आले होते. मंचावर माजी खासदार सुभाष वानखेडे, जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यासह मुंदडा गटाचे सर्वच विरोधक मोठ्या संख्येने हजर होते. दुष्काळ जाहीर करण्याची शेतकर्यांची मुख्य मागणी दुर्लक्षित करून शिवसेनेच्या नेतेमंडळींनी भाषणामधून अॅड. जाधव यांचाच गवगवा केला. तर अॅड. जाधव यांनीही विधानसभेसाठी संधी मिळाल्यास मतदारसंघाचा कायापालट करण्याचे आश्वासन दिले.
(फोटो : सभेत बोलताना शिवसेनेचे इच्छुक उमेदवार अॅड. शिवाजी जाधव. सोबत सुभाष वानखेडे, जिल्हाप्रमुख संतोष बांगर आदी)