परभणी - एमआयडीसीच्या भूसंपादनाचा मावेजा देण्यासाठी 7 शेतक-यांकडून 39 हजारांची लाच घेणा-या उस्मानाबादच्या उपविभागीय अधिकारी शोभा राऊत यांच्या परभणीतील भाड्याच्या घरात 88 लाख 69 हजार 167 रुपयांचे घबाड हाती लागले. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने बुधवारी मध्यरात्री राऊत यांच्या येथील पाच खोल्यांच्या घरावर छापा टाकला. तेव्हापासून गुरुवारी सायंकाळपर्यंत संपत्तीची मोजदाद सुरू होती. आणखी रक्कम सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आधी शिक्षिका असलेल्या राऊत 2001 मध्ये उपजिल्हाधिकारी झाल्या. पुढे परभणी, बीड, उस्मानाबाद येथे त्यांनी 13 वर्षे नोकरी केली. त्यांना 52 हजार रुपये पगार होता. परभणीतील ममता कॉलनीजवळ चाटे यांच्या घरात राहणा-या राऊत यांच्या घरात रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या वस्तू, बँका, टपाल खात्यातील ठेवी अशी माया हाती लागली. बुधवारी मध्यरात्री सुरू झालेला तपास गुरुवारी सायंकाळपर्यंत सुरूच होता. घरातील कानाकोप-यात चिल्लरपासून सर्वत्र पैसाच पैसा आढळून आला. राऊत परभणीत 3 वर्षे उपजिल्हाधिकारी होत्या. निवडणूक आणि भूसंपादन विभागात त्या कार्यरत होत्या. साइड पोस्ट असल्याने त्या फारशा लक्षकेंद्रित नव्हत्या. तत्पूर्वी, त्या बीडलाही उपजिल्हाधिकारी होत्या. काही महिन्यांपूर्वीच त्यांची उस्मानाबादला बदली झाली होती. उस्मानाबादेतील लाचखोरीप्रकरणी राऊत यांना रंगेहाथ पकडणा-या एसबीच्या अधिकारी अश्विनी भोसले यांनी परभणीचे उपअधीक्षक अनिल गायकवाड यांना फॅक्सद्वारे ही कारवाई करण्यास कळवले होते.
अर्धा किलोचे दागिने
17,09,810 रोख रक्कम
10,30,080 रुपयांचे दागिने
59,95,213 रुपयांची विविध बचतपत्रे व विमा