आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोडा, खरेदी करा; आठवड्याला तोळाभरच, चलन तुटवड्याने व्यावसायिकांचे कंबरडे मोडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - ‘तुम्हाला सोने मोडायचे असेल तर आठवड्याला एका तोळ्याचीच रक्कम मिळेल, अधिक रक्कम हवी असेल तर जुन्या नोटा घ्याव्या लागतील’, सराफाच्या तोंडून शब्द बाहेर पडताच पंधरा दिवसांवर लग्न आलेल्या वधुपित्याचे अवसानच गळाले. नोटाबंदीच्या निर्णयापासून बाजारातील स्थिती सुधारलेली नाही. दुसरीकडे मोडीसाठी आलेल्या सोन्याची रक्कम देण्यासाठी व्यापाऱ्यांकडेही पैसे नाहीत. व्यापाऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावरून आठवड्याला केवळ ५० हजार रुपये काढण्याची मर्यादा असल्याने व्यवहार करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच शासनाने सोने बाळगणाऱ्यांवर मर्यादा आणल्याने बाजारात अस्थिरता तसेच जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर ९ तारखेपासून सराफा बाजारात तेजी आल्याचे चित्र निर्माण झाले होते. उस्मानाबादेत मात्र मोजक्याच सोने व्यापाऱ्यांनी जुन्या नोटांवर व्यवहार केले. सोन्याची मागणी आली तरी नोटाबंदीमुळे बहुतांश व्यापाऱ्यांनी ‘रिस्क’ नाकारली. त्यामुळे नोटाबंदीपासून आपटलेला सोन्याचा बाजार उचल घेण्याचे नाव घेत नाही. जेमतेम एक-दोन ग्रॅम खरेदी-विक्रीचा तोही चलनातील नोटांवर व्यवहार टिकून आहे. वास्तविक, सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. नववधूला अंगभर सोने घालून लग्नात हौसेने मिरवण्याचे दिवस. मात्र, रोखीने व्यवहार करण्यासाठी रकमेचा तुटवडा आहे. बँकेतून व्यवहार करण्यावर कमालीची मर्यादा आणि शिल्लक सोन्याच्या मोडीतून पैसे करण्यासाठी गेल्यानंतर सराफांकडील चलनतुटवड्याने वधू-वरांकडील मंडळीची पंचाईत झाली आहे. बाजारात अजूनही पाचशे रुपयांच्या नोटा आलेल्या नाहीत. बँकेतून आठवड्याला २४ हजारांपेक्षा अधिक रक्कम काढता येत नाही. व्यापाऱ्यांकडेही सोन्याच्या मोडीची रक्कम देण्यासाठी पैसे नाहीत. दरवर्षी दिवाळीनंतर उसळी घेणारा सराफा बाजार यावर्षी मात्र शासनाच्या नवनवीन नियमांमुळे दिवसेंदिवस रसातळाला चालला आहे. उस्मानाबाद शहरातील काही व्यापाऱ्यांनी तर दुकान बंद करून थेट शेतीसह जोडव्यवसाय शोधला आहे. विशेषत: छोट्या सराफ व्यावसायिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी कराच्या मुद्द्यावरून सराफ बाजारपेठ बेमुदत बंद होती. त्यात छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले. त्यानंतर बाजार सावरण्यापूर्वीच नोटाबंदीचा निर्णय झाल्याने व्यवहार ठप्प झाला आहे.

९ नोव्हेंबरनंतर सोन्याच्या दरात ४ हजारांनी वाढ झाल्याची चर्चा पसरली होती. मात्र, उस्मानाबादमध्ये दरामध्ये वाढ झाली नव्हती. उलट २० दिवसांत ३० हजार ५०० रुपयांवरून सोन्याचे दर प्रतितोळा २८ हजार ५०० रुपयांवर आले आहेत. विशेष म्हणजे असे असले तरी सोन्याची विक्री किंचितही वाढलेली नाही. उलट विक्री ठप्प आहे.

अतिरिक्त सोने असणाऱ्या कुटुंबात काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे. कुणी सोने मोडण्याच्या मानसिकतेत, तर काही भाव कमी झाल्यानंतर खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत.

शहरातील काही सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले , दोन दिवसांपासून सोने मोडीसाठी ग्राहकांचे फोन येत आहेत. मात्र, त्यांना देण्यासाठी आमच्याकडे रक्कम नाही. खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे, मात्र मोडणाऱ्यांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. परिणामी येत्या काही दिवसांत दर आणखी घसरण्याची शक्यता आहे.

बाजारपेठेत ग्राहकांचा पत्ता नाही. सोने बाळगण्यावर आलेली बंधने लक्षात घेता बाजारपेठेत सोने मोडण्यासाठी गर्दी वाढेल, असा अंदाज होता. मात्र, अद्याप ग्राहकांची मागणी आलेली दिसत नाही.बाजारपेठ ठप्प आहे. ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. लग्नसराई असूनही किरकोळ तरी अल्प प्रमाणात खरेदी होते. किरकोळ खरेदीनंतर दोन हजारांची नोट दिली जाते. मात्र, त्यानंतर त्यांना परत देण्यासाठी सुटे पैसे नसतात. ग्राहकांना देण्यासाठी पैसे नसल्याने मोडही घेत नाही.
राणीहार रद्द, तोळ्यावरच भागवले
शहरातील एका मध्यमवर्गीय कुटंुबातील वराचा येणाऱ्या ४ तारखेला विवाह आहे. वधूच्या पसंतीप्रमाणे दागिने घेण्याची तयारी झाली होती. मात्र, सराफाकडे गेल्यानंतर त्याने चलनातील नोटांचाच आग्रह धरला. पाचशे रुपयांच्या नोटांवर व्यवहार चालणार नाही, अशी अट ऐकल्यानंतर वरमंडळीने वधूच्या नातेवाइकांना फोनवरून व्यवहाराची अडचण सांगितली. त्यानंतर वधूमंडळीने समजूतदारपणाची भूमिका घेतली आणि राणीहारापासून अन्य सगळे दागिने रद्द करून केवळ एक तोळ्याचे गंठन घेण्याचा निर्णय झाला.
व्यवहार ठप्प, छोट्या दुकानांना कुलूप
उस्मानाबाद शहरात सराफ-सुवर्णकारांची १५० दुकाने आहेत. या दुकानांतून दररोज ४ कोटींची उलाढाल होते. नोटाबंदीच्या निर्णयापासून छोट्या व्यावसायिकांचे व्यवहार शून्यावर आले आहेत, तर मध्यम ते मोठ्या व्यावसायिकांचे व्यवहार ग्रॅम-दोन ग्रॅमवर आले आहेत. त्यामुळे ४ कोटींवरची उलाढाल अवघ्या ४ लाख रुपयांवर आली आहे.
दर घसरले तरी उलाढाल वाढेना
^हजार-पाचशेच्या नोटाबंदीनंतर सोन्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाल्याची आवई उठवण्यात आली. वास्तविक, सराफांकडेच मोठी रक्कम नसल्याने साेन्याची विक्रीच झाली नसल्याचे व्यापारी सांगतात.
-रघुवीर चित्राव, सोनाली ज्वेलर्स, उस्मानाबाद.
बातम्या आणखी आहेत...