उस्मानाबाद - सर्वच पातळीवर महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा डंका पिटला जात असला तरी व्यवस्थेतील त्रुटींमुळे याच महाराष्ट्रात 9 वर्षीय मुलीचा बळी गेला. पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतर आवश्यक ह्युमन रेबीज इमेन्यून ग्लोब्युलिन ही लस जंग-जंग पछाडूनही कोठेच न मिळाल्याने प्रणाली वाघ या मुलीचा रेबीजची लागण होऊन तडफडून मृत्यू झाला.
उस्मानाबाद शहराजवळील नारीवाडी (ता. बार्शी) येथील प्रणाली हनुमंत वाघ या तिसरीत शिकणार्या मुलीला 6 जून रोजी सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने उजव्या डोळ्याजवळ चावा घेतला. पालकांनी तत्काळ उपचारासाठी तिला उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे तिला प्रथमोपचार करून रेबीजची लागण होऊ नये यासाठी अँनिमल रेबीज इमेन्यून ग्लोब्युलिन लस देण्यासाठी तिची चाचणी घेण्यात आली. परंतु या लसीमुळे तिच्यावर दुष्परिणाम जाणवू लागल्याने तिला ह्युमन रेबीज इमेन्यून ग्लोब्युलिन ही लस देण्यासाठी सोलापूरकडे सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पाठवण्यात आले.
सोलापूरला जाऊनही काहीच फायदा झाला नाही. कारण तिला उपचारासाठी आवश्यक ह्युमन रेबीज इमेन्यून ग्लोब्युलिन ही लस कोठेच मिळाली नाही. वडील, चुलते, इतर नातलग राज्याच्या विविध भागात ही लस मिळवण्यासाठी धावपळ करत होते. घरची परिस्थिती साधारण असतानाही वाटेल ती रक्कम देण्यास तयार होते. परंतु लस काही मिळाली नाही. अखेर प्रणालीला घेऊन पालक घरी परतले. त्यानंतर व्हॅक्सिनचे उपचार उस्मानाबादच्याच रुग्णालयात सुरू ठेवले. या कालावधीतही लस मिळवण्यासाठी धडपड सुरूच होती. परंतु यश आले नाही. परिणामी 19 जून रोजी उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात व्हॅक्सिनसाठी दाखल झालेल्या प्रणालीला रेबीजची लक्षणे आढळल्याने येथील डॉक्टरांनी पुन्हा तिला सोलापूरला पाठवले. तेथेही लस न मिळाल्याने अखेर 22 जून रोजी तिचा तडफडून मृत्यू झाला.
प्रशासन गाफील
शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक शासकीय रुग्णालयात कुत्रे अथवा इतर कोणताही प्राणी चावल्यानंतर देण्यासाठी अँटी रेबीजची लस ठेवण्याचे आदेश आहेत. त्यानुसार शासकीय रुग्णालयात अशा लस उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर देण्यासाठी अँनिमल रेबीज इमेन्यून ग्लोब्युलिन व ह्युमन रेबीज इमेन्यून ग्लोब्युलिन या दोन लसींचा वापर केला जातो. ही लस पिसाळलेला कुत्रा चावल्यापासून 48 ते 72 तासांत देणे आवश्यक आहे. यापैकी अँनिमल अर्थात घोड्यापासून बनवलेली लस सर्वत्र उपलब्ध होते. मात्र, मानवी घटकापासून बनवली जाणारी लस केवळ मेडिकल कॉलेज संलग्नित रुग्णालयांमध्येच उपलब्ध असते.
अकलूज, सांगली, पुणे, मुंबई, हैदराबादेतही लस नाही
अँनिमलची रेबीज लस तिला लागू पडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ह्युमन लसच्या शोधासाठी नातलगांनी जंग-जंग पछाडले. सोलापूर, अकलूज, सांगली, पुणे, मुंबई, हैदराबाद आदी ठिकाणी शोध घेतला. मात्र, कोठेच लस मिळाली नाही. ही लस शासकीय रुग्णालयात उपलब्ध असल्याने खासगी विक्रेते ती लस ठेवत नाहीत. दुसरीकडे प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेतली नसल्याने एक बळी गेला. दुर्दैवाने पिसाळलेल्या कुत्र्याने आठ ते दहा जणांना चावा घेतला असता तर प्रशासनाने काय केले असते, हा प्रश्न प्रशासन व्यवस्थेतील अनेक उणिवा ठळकपणे दाखवून देतो.