आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाराटंचाईमुळे खडकूतच्या गोशाळेपुढे संकट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - नांदेडजवळील खडकूत येथील प. पू. संतबाबाजी जगदीश महाराजांची गोरक्षण ही गोशाळा चा-याअभावी अडचणीत आली आहे. पाणीटंचाईमुळे चा-याचा भाव गगनाला भिडला आहे. यापुढील काळात पैसे देऊनही चारा मिळतो की नाही, असा प्रश्न गोशाळा चालकांना पडला आहे.

प. पू. जगदीशजी महाराज यांच्या नांदेडमधील गाडीपुरा येथील गोशाळेत 200 गायी होत्या. त्या ठिकाणी जागा कमी पडू लागल्याने त्यांनी खडकूत येथे 12 एकरच्या परिसरात गोशाळा उभारली. आजघडीला त्या ठिकाणी 800 ते हजार गायी आहेत. दररोज गायींना चारा दिल्यानंतरच जगदीश महाराज पाणी प्राशन करतात तोपर्यंत ते काहीही घेत नाहीत. गरिबांना अन्नदान, कपडे वाटप यासारखी मदत ते नेहमी करत असतात. गोशाळेतील गायींचे दूध काढून बाहेर विक्री न करता तेथील वासरांनाच ते दूध पाजले जाते. फक्त गोमूत्रापासून आयुर्वेदिक औषध निर्मिती केली जाते. भक्तांना वाईट व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला ते नेहमी देतात. विशेष बाब म्हणजे येथील एखादी गाय दगावली तर तिला उघड्यावर फेकून गिधाडाच्या हवाली न करता गोशाळेच्या परिसरातच गायीसाठी सोडलेल्या स्मशानभूमीत पुरले जाते.

पूर्वी खेड्यापाड्यांत जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. प्रत्येक शेतक-याच्या दावणीला दहा-पाच गायी, म्हशी असायच्या. त्यामुळे खेड्यातून शहरात दूध, दही, तूप, लोणी विक्रीसाठी आणले जात असे. बदलत्या परिस्थितीत जनावरांची संख्या दिवसेंदिवस रोडावत गेली. त्यामुळे दुग्ध उत्पादन घटले. शहरात विक्री होणारे पाकीटबंद दूध आज खेड्यामध्येही मोठ्या प्रमाणात विक्री होताना आढळते. त्यामुळे खेड्यातून शहराऐवजी शहरातून खेड्यात असे उलटे चक्र फिरले आहे.

यांत्रिकीकरणाचा परिणाम
शेती मशागतीसह पेरणीची कामे यंत्राने होऊ लागल्याने व चा-यांचा प्रश्न उद्भवू लागल्यामुळे जनावरांची संख्या घटली. अनेकांनी जनावरे खाटकाच्या दावणीला बांधल्यास पाप लागेल म्हणून गोशाळेला दान केली.
खडकूत येथील जगदीश महाराजांच्या गोशाळेत दरमहा सहा लाख रुपयांचा चारा लागतो. हायब्रीड ज्वारीचा कडबा गायींना दिला जात नाही तर टाळकी ज्वारीचा कडबा किंवा उसाचा वाडा किंवा गवत, हिरवे वैरण आदींचा यात समावेश असतो. पाणीटंचाईमुळे सध्या चा-याचा भाव गगनाला भिडला आहे.
अर्थकारण बिघडणार
आजपर्यंत चा-याची पेंढी आठ रुपये प्रतिदराने मिळत होती. दररोज 20 हजार रुपयांचा चारा घ्यावा लागत होता, परंतु टंचाई काळात चा-याचा भाव 12 ते 15 रुपये प्रतिपेंढी झाला आहे. त्यामुळे दरमहिना खर्च सहा लाखांवरून 12 ते 15 लाखांपर्यंत गेल्यामुळे गोधनांना जगवण्याचा गंभीर प्रश्न येथील गोशाळेसमोर आहे. तसेच पुढील काळात चारा मिळेल का नाही हासुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे येथील अर्थकारणाची घडी विस्कटण्याची भीती आहे.
देणगीतून चालवली जाते गोशाळा
खडकूत येथील गोशाळा भक्तांच्या दानधर्मातून चालवली जाते. जगदीश महाराज यासाठी निधी कोठून आणतात ते त्यांनाच माहीत. परंतु चा-याचा गंभीर प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे. शासनाकडून आजपर्यंत कुठलीच मदत आम्हाला मिळाली नाही.
गोविंद शर्मा, व्यवस्थापक, गोशाळा खडकूत