आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवरात्रोत्सव: कुंकवात न्हाली तुळजामाय!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभूतपूर्व उत्साहात मातेचे सीमोल्लंघन, पहाटे रंगला कार्यक्रम, कुंकवाची उधळण, आई राजा उदो उदोच्या जयघोषात मातेचा सोहळा, मानकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज, चौघे मानकरी जखमी
तुळजापूर - आई राजा उदो उदोच्या जयघोषात, संबळाच्या कडकडाटात सौभाग्याचे लेणे कुंकवाच्या मुक्त उधळणीत कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीचा सीमोल्लंघन सोहळा मंगळवारी(दि.११) पहाटे पार पडला. या वेळी सुमारे ५०० किलो कुंकवाची भाविकांनी उधळण केली. सीमोल्लंघन सोहळ्यानंतर तुळजाभवानी देवी श्रमनिद्रेसाठी नगरच्या पलंगावर विसावली. दरम्यान, आता शहरवासीयांना अाश्विन पौर्णिमेचे वेध लागले असून रविवारच्या यात्रेसाठी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नगरच्या पलंग पालखी सोबतच्या मानकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात चौघे मानकरी जखमी झाले.
मंगळवारी पहाटे ५ वाजता देवीची धूपारती होऊन देवीची मूर्ती १०८ साड्यांमध्ये लपेटण्यात आली. पहाटे ५.४५ वाजता साड्यंामध्ये गुंडाळलेली तुळजाभवानीची मूर्ती बऱ्हाणपूरच्या पालखीमध्ये ठेवण्यात आली. तत्पूर्वी सिंहासनाजवळ दोन धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर संबळाच्या कडकडाटात आणि आई राजा उदो उदोच्या जयघोषात पालखीतून तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रदक्षिणा मार्गावरून प्रदक्षिणा काढण्यात आली. दरम्यान, होमुकंडाजवळील पिंपळाच्या पारावर विसाव्यासाठी पालखी ठेवण्यात आली. या वेळी तुळजाभवानी देवीला मानाच्या आरत्या होऊन नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर प्रदक्षिणा पूर्ण करून देवी सिंहगाभाऱ्यात नगरच्या पलंगावर विसावली. तत्पूर्वी सोमवारी रात्री १२ वाजता देवीच्या अभिषेक पूजेस प्रारंभ करण्यात आला, तर पहाटे २ च्या सुमारास अभिषेक पूजा संपल्यानंतर तुळजाभवानी देवीला महावस्त्रे,अलंकार घालण्यात आले. पहाटे ३ वाजता नगरचा पलंग व बऱ्हाणूपरच्या पालखीवाल्यांचा तसेच इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, सीमोल्लंघन सोहळ्यासाठी नगरचा पलंग आणि भिंगारच्या पालखीचे पहाटे ३ वाजेच्या सुमारास वाजतगाजत राजेशहाजी महाद्वारामधून मंदिरात आगमन झाले. यावेळी पलंग पालखीसोबतच्या मानकऱ्यांना पोलिसांनी राजेशहाजी महाद्वारात रोखले. यावेळी मानकरी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. तसेच तोपर्यंत गर्दीही वाढल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करून गर्दी पांगवली. यावेळी झालेल्या भाविकांच्या पळापळीत महाद्वार परिसरातील दुकानांचे नुकसान झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तर पलंग पालखीसोबतच्या मानकऱ्यांना पूर्वापार चालत आलेला मान न देता पोलिस गुंडागर्दी करीत असल्याचा आरोप केला.
देवी रविवारी सिंहासनावर
अाश्विन पौर्णिमेदिनी म्हणजे रविवारी (दि.१६) पहाटे निद्रा संपवून तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येईल. तर सकाळी ११ च्या सुमारास सोलापूरच्या शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्या घाटशीळमार्गे शहरात दाखल होऊन सचिन पाटील यांच्या वाड्यात विसावतील. सायंकाळी शिवलाड तेली समाजाच्या काठ्यांसह छबिना काढण्यात येईल.
तुळजापूर कुंकुमय
सीमोल्लंघनादरम्यान मोठ्या प्रमाणावर कुंकवाची उधळण करण्यात आल्याने मंदिराचा परिसर लालजर्द झाला होता. हे कुंकू घरी घेऊन जाण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. मंदिरासह शहरातील रस्ते कुंकवाने माखून गेले होते.
सुवासिक तेलाने अभिषेक
सीमोल्लंघन झाल्यानंतर तुळजाभवानी देवी नगरच्या पलंगावर विसावली. त्यानंतर मुख्य मंदिर बंद करण्यात आले. त्यानंतर सकाळी ८ वाजता मुख्य मंदिर उघडण्यात येऊन पलंगावरच देवीची चरणतीर्थ पूजा होऊन अभिषेक पूजेला प्रारंभ झाला. श्रमनिद्रेदरम्यान देवीला सुवासिक तेलाने अभिषेक घातला.सुवासिक तेलाने अभिषेक
सीमोल्लंघन झाल्यानंतर तुळजाभवानी देवी नगरच्या पलंगावर विसावली. त्यानंतर मुख्य मंदिर बंद करण्यात आले. त्यानंतर सकाळी ८ वाजता मुख्य मंदिर उघडण्यात येऊन पलंगावरच देवीची चरणतीर्थ पूजा होऊन अभिषेक पूजेला प्रारंभ झाला. श्रमनिद्रेदरम्यान देवीला सुवासिक तेलाने अभिषेक घातला.
कुंकवाच्या मुक्त उधळणीत कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीचा सीमोल्लंघन सोहळा पार पडला.
बातम्या आणखी आहेत...