आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shripal Sabnis Comment On Aamir Khan's Statement

असहिष्णुतेच्या घटना घडल्या तरी बायकोचं एवढं ऐकावं का : श्रीपाल सबनीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - देशात असहिष्णुतेच्या काही घटना घडल्या असल्या तरी देश सोडून जावा इतकी वाईट परिस्थिती नाही. त्यामुळे आमिर खान या अभिनेत्याने त्या अनुषंगाने केलेले वक्तव्य दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करून बायकोचं एवढं ऐकावं का, असाही प्रश्न मला वाटतो, असे विधान अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले. लातूरमध्ये बुधवारी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सबनीस म्हणाले की, गायीचे मांस खाल्ल्याच्या प्रकरणापासून असहिष्णुता शब्द चर्चेत आला. मात्र, काही घटना घडल्या म्हणून अतिथी देवो भव म्हणणाऱ्या आणि सत्यमेव जयतेचा नारा देणाऱ्या अामिर खानला देश सोडून जावा, असे वाटणे दुर्दैवी आहे. बायकोचं एवढं ऐकावं का? हाही प्रश्न आहेच. भारतीय परंपरा एवढी असहिष्णू आहे का, असा सवालही त्यांनी केला. पुरस्कार परत करण्याच्या मुद्द्यावरही सबनीस यांनी परखड मत व्यक्त केले. असहिष्णुतेच्या नावावर पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांचे स्वातंत्र्य मी मान्य करतो. मात्र, त्याअगोदर त्यांनी सरकारशी संवाद साधला असता तर बरं झालं असतं. किमान आता तरी त्यांनी संवाद साधावा, लेखन सुरू ठेवावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

साक्षी महाराजांसारख्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाले. मी हिंदू आहे. माझे वडील हिंदू आहेत आणि तरीही मी धर्मनिरपेक्ष आहे. भारतीय राज्यघटनाही धर्मनिरपेक्ष आहे. त्याच राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून देशात कोणत्याही धर्माचा उन्माद खपवून घेऊ नये, असे ते म्हणाले. त्याचबरोबर हिंदूंचा, मुस्लिमांचा, बौद्धांचा, लेखकांचा, कलावंतांचाही असहिष्णू उन्माद खपवून घेता कामा नये, असे त्यांनी ठासून सांगितले. देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहायला हवे. पाकिस्तानातील कलावंतांना देशात गाण्यासाठी बंदी अनाठायी आहे. कलावंतांना देशाच्या सीमा रोखू शकत नाहीत. जाती व्यवस्था मोडित काढायला हवी. संतांना जातींच्या बंधनात अडकवणे मूर्खपणाचे अाहे, असेही मत त्यांनी दुसऱ्यासंदर्भात बोलताना व्यक्त केले. लातूरमध्ये त्यांनी "लोकसंस्कृती : काल, आज, उद्या' या पुस्तकाचे प्रकाशन केले.
सबनीस झाले भावुक
नियोजित साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतर मला लातूरमधून सत्कारासाठीची अनेक निमंत्रणे आली. मात्र, इतक्यात सत्कार नको असे म्हणून मी नम्रपणे नाकारली. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मात्र आवर्जून आलो आहे. लातूर जिल्हा जन्मभूमी आहे. लातूरमध्ये माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. त्या वेळेसच्या गुरूंना, इथल्या भूमीला विनम्र अभिवादन, असे म्हणत असतानाच सबनीसांना गहिवरून आले.