आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभर कोटींच्या उलाढालीवर पाणी फिरणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - बाजारपेठेतील साखरेचे उतरलेले दर, उसाचे एकरी घटलेले उत्पादन व साखर उतार्‍यात होत असलेली घट यामुळे दररोज 10 हजार मेट्रिक टन गाळपाची क्षमता असलेल्या जिल्ह्यातील चार खासगी साखर कारखान्यांना यावर्षी मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जाणार आहेत. अंदाजे 100 कोटींपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक फटका कारखान्यांसह त्यावर अवलंबून असणार्‍या उद्योगांना बसणार असल्याचे चित्र आहे.

परभणी जिल्ह्यात त्रिधारा (लोहगाव), योगेश्वरी (विटा), रेणुका (पाथरी) व गंगाखेड शुगर (माखणी) हे सर्वच खासगी तत्त्वावरील साखर कारखाने आहेत. सहकाराचा स्वाहाकार झाल्यानंतर नृसिंह सहकारीचा त्रिधारा शुगर प्रायव्हेट लिमिटेड व पाथरीचा गोदावरी सहकारी कारखाना रेणुका शुगर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कार्यान्वित झाला. खासगी तत्त्वावरील या कारखानदारीने मात्र, नेटाने व्यावसायिकता जोपासत दरवर्षीच बॉयलर पेटत ठेवण्याचा प्रयत्न केल्याने जिल्ह्यातील उपलब्ध ऊस पूर्णपणे गाळप होऊ लागला आहे. कारखान्यांची क्षमता दररोज 10 हजार मेट्रिक टन असली तरी यावर्षी उसाचे लागवड क्षेत्र पाण्याअभावी घटले आहे. 19 जानेवारीपर्यंत या चार कारखान्यांनी आठ लाख 72 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून यातून 9 लाख 2 हजार 540 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. चारही कारखाने दरवर्षी साधारणत: 18 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करतात; परंतु यावर्षी ऊसच उपलब्ध होणार नसल्याने हा आकडा 12 ते 13 लाख टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात कारखाने बंद करण्याची वेळ येणार आहे. साखर उत्पादनाबरोबरच या साखर कारखान्यांतून स्पिरिट, इॅथेनॉल निर्मितीतही घट होणार आहे. सर्वच कारखान्यांना सुरुवात होऊन 65 ते 80 दिवस झाले आहेत. आतापर्यंत आलेला साखरेचा उताराही 10.50 ते 11.15 सरासरी आलेला आहे. हा सरासरी उतारा अखेरपर्यंत 10.75 असा चारही कारखान्यांचा मिळून येईल. त्यामुळे उतार्‍यात होत असलेली घट आर्थिक फटक्यास कारणीभूत ठरेल.


साखरेच्या भावाने मोठा फटका..
चारही कारखाने साधारणत: 2000 रुपयांचा भाव उसास देत आहेत. त्या तुलनेत साखरेची विक्री सध्या केवळ 3020 ते 3,400 रुपये प्रतिक्विंटल दराने होत आहे. मुळात कारखान्यांना उसावरील प्रक्रियेसाठी एक हजार रुपयांचा खर्च येतो. त्यातून कारखाने शेतकर्‍यांना उसाचे पेमेंट देण्यासाठी उत्पादित झालेली साखर बँकांकडे तारण म्हणून ठेवते. यातून बँक 80 टक्केच कर्ज देत असल्याने साखरेचा प्रतिक्विंटल भाव आजच्या स्थितीला कारखान्यांना 2600 ते 2700 रुपये प्रमाणेच देते. तेथेच साधारणत: 300 रुपयांचा फटका बसतो. याशिवाय, सध्या कारखान्यावर येत असलेला ऊस पाण्याअभावी वाळलेला आहे. त्यामुळे गाळपात येत असलेली उतार्‍यातील घट आर्थिक फटक्यास कारणीभूत ठरू लागली आहे.