आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘श्यामची आई’ कथांचे केले उर्दू भाषांतर, शिक्षिका अख्तर जहाँ कुरैशी यांचा पुढाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकाने अनेकांच्या मनावर गारुड केले आहे. या पुस्तकाचे अनेक भाषात भाषांतरही झाले आहे. मात्र उर्दू माध्यमातून या कथा उपलब्ध नसल्याचे लक्षात आल्यानंतर जालन्यातील पालिका शाळेतील शिक्षिका अख्तर जहाँ कुरैशी यांनी या कथांचे आता उर्दू मध्ये भाषांतर करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांनी भाषांतरित केलेल्या या कथा उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
 
श्यामची आई या पुस्तकाकडे संस्कारांचा अनमोल ठेवा म्हणून पाहिले जाते. अनेक पिढ्यांवर संस्कार करण्याचे काम या पुस्तकाने केले. या पुस्तकातील संस्काराचा ठेवा उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची धडपड शिक्षिका अख्तर जहाँ कुरैशी या करीत आहेत. त्या जालना नगरपालिकेच्या मुर्गी तलाव येथील शाळेवर शिक्षिका आहेत. त्यांनी स्वत: सानेगुरुजींच्या श्यामची आई या पुस्काचे अनेकवेळा वाचन केले. प्रत्येकवेळी या पुस्कातून वेगळा अनुभव मिळतो.
 
यातील अनेक गोष्टी त्यांनी मराठी भाषेतच उर्दू च्या विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्या विद्यार्थ्यांना समजल्या. मात्र मराठी समजून घेण्यास त्यांना अडचण येते, हे लक्षात घेत त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थ्यांसाठी श्यामची आई हे पुस्तक उर्दू मध्ये भाषांतरीत करण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत १४ कथा लिहून त्यंानी पूर्ण केल्या आहेत. सोबतच त्यांचे प्रुफ रिडींग करून घेतले आहे. लवकरच संपूर्ण पुस्तकाचे भाषांतर पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
झेरॉक्स विद्यार्थ्यांपर्यंत
साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून उर्दूत भाषांतरीत केलेल्या या कथा जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात आल्या. विद्यार्थ्यांना त्या खुपच आवडल्या. अनेक विद्यार्थी आता आपल्या शाळेत इतर विद्यार्थ्यांना उर्दू भाषेतच या कथा सांगत आहेत. केवळ शहरी भागातच नाही तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत या गोष्टी पोहचविल्या जात आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पुस्तकासाठी प्रयत्न; परवानगीनंतर प्रकाशन  
सध्या तरी केवळ विद्यार्थ्यांना या पुस्तकातून संस्कार मिळावेत या हेतूने कथांचे भाषांतर करीत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर उर्दू माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित करता येईल का, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवाग्या मिळाल्या तरच उर्दू माध्यमातून हे पुस्तक प्रकाशीत करू, असे अख्तर जहाँ कुरेशी यांनी सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...