आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५० कोटींच्या ठेवींवर भाजपचा डोळा : आ. सत्तार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - सिद्धेश्वर अर्बन बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीला रंग चढला असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. प्रभाकर पालोदकरांचा मुद्दा बाजूला पडला असून भाजप विरुद्ध आमदार अब्दुल सत्तार असा सामना रंगला आहे. भाजपचा ५० कोटींच्या ठेवीवर डोळा असल्याचा आरोप आमदार सत्तार यांनी केला.
सिद्धेश्वर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी ५ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. १३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. भाजप मुर्डेश्वर सहकार विकास पॅनलच्या माध्यमातून कपबशी चिन्हावर, तर प्रभाकर पालोदकर व आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सहकार महर्षी दादासाहेब पालोदकर विकास पॅनल छत्री चिन्हावर निवडणूक लढवत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिलीच निवडणूक असल्याने भाजप व आमदार सत्तार यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीपूर्वी यानिमित्ताने तलवारीला धार लावण्यास सुरुवात केली.

दिवंगत दादासाहेब पालोदकरांनी स्थापन केलेली बँक घशात घालण्याचे सत्तार यांचे प्रयत्न असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. साखर कारखान्याचे वाटोळे करणाऱ्या भाजपच्या हातात बँक देणार का, असा सवाल सत्तार करीत आहेत. आरोप न करता बँक, सभासद व ठेवीदारांचे हित जोपासल्याचा मुद्दा प्रभाकर पालोदकरांनी लावून धरला आहे. भाजप व आमदार सत्तार मंडळांचा जोरदार प्रचाराचा धडाका सुरू आहे.

निवडणूक अटीतटीवर : सिल्लोड तालुक्यातील ६५ गावांत नऊ हजार १६६ तर भोकरदन, कन्नड, औरंगाबाद, फुलंब्री, पैठण व वैजापूर तालुक्यांतील ३४२ मतदार असे नऊ हजार ५०८ मतदारांसाठी २२ मतदान केंद्रे आहेत. गावागावात सभांचे आयोजन करून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. परंतु पोस्टर, बॅनर, पत्रकांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्याचा दोन्ही मंडळांचा रयत्न आहे. सहज वाटणारी निवडणूक अटीतटीवर आली आहे. स्थापनेपासून ताब्यातील बँक टिकवण्यासाठी पालोदकरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती, सकारखान्यानंतर बँकेत पालोदकर व सत्तारांना झटका देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
आमदार सत्तारांचे आरोप

भूलथापा देऊन भाजपने साखर कारखान्यावर सत्ता मिळवली. नियोजन नसल्याने आज कारखान्यावर ५० कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा केला. सिद्धेश्वर अर्बन बँकेच्या ५० कोटींवर भाजपचा डोळा आहे. केवळ विरोध करण्यासाठी प्रभाकर पालोदकरांच्या विरोधात पॅनल उभे केले. असा आरोप आमदार सत्तार यांनी केला. मतदारांसमोर भाजपचे सवाल
दादासाहेब पालोदकर हयात असताना सर्वाधिक त्रास देणाऱ्या आमदार सत्तार यांना आता पालोदकरांचा पुळका का आला? बँकेच्या हितासाठी प्रभाकर पालोदकरांनी तुम्हाला कधी विश्वासात घेतले का? प्रभाकर पालोदकर साखर कारखान्याचे चेअरमन असताना कारखाना बंद पाडून कामगारांना बेरोजगार करणाऱ्या सत्तारांना पालोदकरांनी कशासाठी सोबत घेतले?आपली माणस घुसवून बँक ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्तारांच्या ताब्यात बँक देणार का?, असे प्रश्न भाजपकडून विचारले जात आहेत.
पालोदकरांचे मुद्दे : अर्बन बँकेचे नेतृत्व करीत असताना समाजातील सर्व स्तरातील लोकांना व राजकीय पक्षांना सोबत घेऊन काम केले. ८० टक्के भुसार मालाचे व्यापारी बँकेशी निगडित आहेत. अब्दुल सत्तार यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. याबरोबर अर्थसाहाय्य करण्याचे काम सिद्धेश्वर बँकेच्या माध्यमातून केले. शिक्षक प्राध्यपकांनाही एक लाखापर्यंत अर्थसाहाय्य केले, असे मुद्दे प्रभाकर पालोदकर मांडत आहेत.