आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक निवडणूक : भाजपची सावध भूमिका नडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - सिद्धेश्वर अर्बन बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत पालोदकर पॅनलच्या विजयामुळे आमदार अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व सिद्ध झाले, तर भाजप डावपेचात कमी पडत असल्याची चर्चा सुरू झाली. आमदार सत्तार व भाजप यांच्या लढाईचे प्रभाकर पालोदकर निमित्तमात्र ठरले. विधानसभा निवडणुकीनंतर सिद्धेश्वर अर्बन बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आ.सत्तार व भाजप यांची आमनेसामने लढाई झाली. सत्तार यांनी आक्रमकपणे निवडणूक लढवली, तर भाजप पुन्हा सावध भूमिका घेत मतदारांसमोर गेल्याने पराभवाचे तोंड पाहावे लागले. प्रभाकर पालोदकरांच्या अस्तित्वाची लढाई म्हणून या निवडणुकीकडे पाहिले गेले.

आजच्या परिस्थितीत सहकार क्षेत्रातील एकमेव संस्था त्यांच्या ताब्यात आहे. ही संस्था त्यांना कधी भाजपच्या तर कधी सत्तारांच्या आधाराने ताब्यात ठेवण्याची कसरत करावी लागते. तालुक्यातील राजकारणात निर्णायक मतदानात कामी येणारा नेता म्हणून आमदार सत्तार हे पालोदकरांशी जवळीक साधून आहेत. याचा दोघांनाही उपयोग होतो; परंतु यातून भाजपची ताकद मोठी असल्याचे समोर आले आहे.

तालुक्याच्या राजकारणावर पकड ठेवताना कधी काळी भाजपला मदतीची गरज होती. आज भाजपशी लढताना शक्तिमान प्रतिमा असणार्‍या सत्तार-पालोदकर या दोन नेत्यांना एकत्र यावे लागते. भाजपतील गटांशी आमचा संपर्क असल्याची चर्चा करून लोकांसमोर संभ्रम निर्माण करावा लागतो. यातच भाजपची ताकद दिसून येते. वर्षानुवर्षे पालोदकरांची पकड असणारी सिद्धेश्वर साखर कारखाना भाजपने सहजपणे ताब्यात घेतला. सिद्धेश्वर बँकेच्या निवडणुकीतील सभासदांशी फारसा संबंध नसताना एक हजार आठशेपर्यत मतदान भाजपच्या उमेदवारांनी घेतले.

सत्तारांची खुबी कामी आली
शिवसेनेचे तालुकाप्रमुख आ.सत्तार व पालोदकरांसोबत असल्याने होणारी बदनामी टाळण्याचा प्रयत्न ऐनवेळी भाजपला पाठिंबा देऊन शिवसेनेने केल्याने त्यांची होणारी बदनामी काही प्रमाणात टाळली गेली. तालुक्याच्या राजकारणाची राजकीय, सामाजिक, जातीय परिस्थिती आज तरी आ. सत्तार यांनी मोठ्या खुबीने सांभाळली आहे. निवडणूक कोणतीही असली तरी त्याचे केंद्रबिंदू सत्तारच असतात. त्यामुळे या मतदारसंघावर त्यांचे वर्चस्व असल्याचे वेळोवेळी सिद्ध होत आहे.