आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्लेगाव प्रकल्पात पाणी आणण्याचा निर्धार, 10 गावांतील सरपंच, लोकप्रतिनिधींची लासूरमध्ये बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन- शिल्लेगाव मध्यम प्रकल्पात शिवना नदीचे पाणी आणणाऱ्या योजनेकरिता पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेचे ठराव व दहा हजार गावकरी, शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन देऊन अखंडित पाठपुरावा करणार अाहोत, अशी ग्वाही ग्रामपंचायत सदस्य गणेश व्यवहारे यांनी दिली. शिल्लेगाव मध्यम प्रकल्प परिसरातील आठ-दहा गावांचे सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधींची आढावा बैठक शुक्रवारी (दि. ३०) ग्रामपंचायत सदस्य गणेश व्यवहारे यांनी आयोजित केली होती. या वेळी ते बोलत होते. या योजनेचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगताना ते म्हणाले, ही योजना लवकरच मार्गी लागल्यास परिसरातील आठ-दहा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल. हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन दुष्काळमुक्त भाग म्हणून ओळखला जाईल.

व्यवहारे यांनी नुकतीच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आराखडा, नकाशासह ही योजना सादर केली. शिल्लेगाव मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा योजना तयार आहेत; परंतु पावसाअभावी या प्रकल्पात पाणी नाही. शिवना नदीचे पाणी सिमेंट पाटाद्वारे शिल्लेगाव प्रकल्पात आणण्याकरिता भूसंपादन करण्याची गरज नसून शासकीय जमिनीतूनच हा सिमेंट पाट नेता येऊ शकतो. केवळ सिमेंट पाटाचाच खर्च या योजनेला येऊ शकतो. शासनाने ही योजना राबवल्यास प्रकल्पात मुबलक पाणीसाठा होऊन परिसरातील अनेक गावांचा पाणीप्रश्न निकाली निघेल. त्यामुळे शासनाने या योजनेचे शासकीय यंत्रणेकडून सर्वेक्षण करावे, अशी विनंती केली. जलसंपदामंत्र्यांनी या योजनेबाबत लवकरच माहिती मागवून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. तसेच आमदार प्रशांत बंब यांनीही सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिल्याचे व्यवहारे यांनी या वेळी सांगितले.
ग्रामसभेचे ठराव सादर : या वेळी विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्त्यांनी मते मांडली. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी इतर योजनांवरही चर्चा झाली. काही गावांनी प्रजासत्ताकदिनी या योजनेला पाठिंबा दर्शवणारे ग्रामसभेचे ठराव या वेळी सादर केले. याप्रसंगी सरपंच सुरेश गव्हाणे (शिल्लेगाव), प्रदीप भुजबळ (लासूर स्टेशन), नितीन कऱ्हाळे (शिरेगाव), कचरू आहेर (महेबूबखेडा), कारभारी गायके (सुलतानाबाद), उपसरपंच प्रकाश घिटरे (भागाठाण), जनार्दन तायडे (देवळी), बाळासाहेब केरे (गवळीशिवरा) यांनी योजनेला पाठिंबा दर्शवला. बापूसाहेब देशमुख, रामेश्वर काकडे, सोपानराव चव्हाण, दादासाहेब तायडे, दत्तू कऱ्हाळे, संतोष दांडगे, आबासाहेब मोडके, सुरेश फुलारे आदींनी मार्गदर्शन केले.
305 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल
शिल्लेगाव मध्यम प्रकल्प १९९४ मध्ये मंजूर झाला; परंतु संथगतीने २००५ मध्ये पूर्ण झाला. प्रकल्पासाठी शासनाने २९१ हेक्टर जमीन संपादित केली. मात्र, हा प्रकल्प पूर्ण झाल्यापासून एकदाही पूर्ण भरलेला नाही. जलस्रोतांचा विचार न केल्याने हा प्रकल्प कोरडाच असतो. ही योजना पूर्ण झाल्यास ९०५ हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी शिवना-शिल्लेगाव योजना गरजेची आहे, असे व्यवहारे यांनी सांगितले.