आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टर पकडताच तलाठ्यास मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्याचा प्रयत्न करणारे तलाठी महेश बडके यांना मारहाण करून तहसीलदारांची गाडी फोडण्याचा प्रकार रविवारी सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास धानोरा येथे घडला. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तलाठी महेश बडके यांना रविवार, दि. २१ रोजी सकाळी मारहाण झाल्यानंतर त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांना डोके, हात व पायास दुखापत झाली आहे.

या वेळी तहसीलदार सुरेश गोरड, तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. या तलाठी महेश बडके व विष्णू सोनवणे यांनी सकाळी सात वाजेच्या सुमारास धानोरा गावालगत असलेल्या पूर्णा नदीपात्रातून वाळू चोरी करणारे दोन ट्रॅक्टर पकडले. दोन्ही ट्रॅक्टर धानोरा गावात घेऊन आल्यानंतर ग्रामपंचायतीसमोर जमलेल्या काही जणांनी ट्रॅक्टर घेऊन जाण्यास विरोध केल्याने बडके यांनी तहसीलदार सुरेश गोरड यांना माहिती दिली. तहसीलदारांनी लगेचच सुभाष राऊत, अभिजित शर्मा व संतोष नवगिरे यांना गाडी देऊन धानोऱ्यास रवाना केले. कारवाई प्रकारातून वाद निर्माण होऊन महेश बडके यांना मारहाण करण्यात आली, तर तहसीलदारांच्या गाडीच्या (एमएच २० यू ९६५३) समोरचा काच फोडण्यात आली.