आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोडच्या मतदार नोंदणीत सावळा गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणीचे प्रमाण लक्षवेधी असून नुकत्याच झालेल्या नोंदणीच्या काळात ३ हजार ६३८ मतदारांनी नावे नोंदविली आहेत. मागील काळात दुबार व स्थानिक रहिवासी नसलेल्या झालेल्या नोंदणीचा प्रकार पाहता संशयास्पद नोंदणी होत असल्याचे नागरिकांचे मत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी फायदेशीर नोंदणी करून घेण्याचा प्रकार वाढीस लागल्याने निकोप निवडणुका होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणूक यंत्रणेला हाताशी धरून अल्पवयीन, स्थलांतरित, गैरहजर व अन्य मतदारसंघातील सोयीच्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करून घेतली जातात. निवडणूक आयोगाच्या मतदारसंख्या वाढविण्याच्या धोरणाचा गैरफायदा घेऊन दुबार व बनावट नोंदणी करण्यात येत असल्याने नोंदणीबाबत संशय निर्माण झाला आहे.

सिल्लोड विधानसभा मतदारसंघात दुबार, स्थलांतरित व गैरहजर मतदरांची नावे वगळण्यात आलेली नाहीत. अशी पंधरा ते वीस हजार नावे असून असे मतदार एकाच मतदारसंघात व एकाच मतदान केंद्रावर मतदान करतील याची दक्षता घेण्याचे आदेश न्यायालयाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक काळात दिले होते; परंतु निवडणूक आयोगाची यंंत्रणा हा प्रकार नियंत्रित करू शकली नाही. २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात २ लाख ५० हजार ४०९ मतदार या मतदारसंघात होते. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ही संख्या २ लाख ७७ हजार ७७९ वर गेली. पाच वर्षात सत्तावीस हजार मतदार वाढले. विधानसभा निवडणुकीनंतर १ ते १६ डिसेंबर या सोळा दिवसांमध्ये ३ हजार ६३८ मतदारांनी नावे नोंदविली. मागच्या पंचवार्षिकपासून नुकत्याच झालेल्या नोंदणीचे प्रमाण पाहता आगामी काळात मतदारसंख्या वाढून आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत तीन लाख मतदार असू शकतात.

संशयाची कारणे
उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बनावट शिक्क्यांचा वापर करून डोंगरगाव तालुका सिल्लोड येथील अल्पवयीन विद्यार्थ्याची वयाची बनावट प्रमाणपत्रे तयार करून मतदारयादीत जून महिन्यात नावे समाविष्ट करून घेतल्याचे माहितीच्या अधिकारात सष्टेंबर २०१४ मध्ये उघडकीस आले; परंतु उपजिल्हा रुग्णालयाच्या बनावट शिक्क्यांचा वापर केल्याचे याच महिन्यात उघड झाले. रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक बबन संतुकराव साळुंके यांनी १ जानेवारी २०१५ रोजी तक्रार दिली.
जून २०१४ ते १ जानेवारी २०१५ या सहा महिन्यांच्या काळात तक्रार का देण्यात आली नाही हा प्रश्न आहे. संगनमताने करण्यात आलेला प्रकार झाकण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा आहे.

बीएलओ यांनी आपल्या तपासणी अहवालात मतदार यादीतील मतदार दिलेल्या पत्त्यावर नसल्याचे, दुबार नावे असल्याचे स्पष्ट करूनही यंत्रणेने मतदार यादीतून नावे वगळली नाहीत. नुकत्याच संपलेल्या पुनरीक्षण कार्यक्रमात नावे वगळण्याची संधी असताना बहुतांश नावे तशीच ठेवण्यात आली आहेत. अशा मतदारांची संख्या हजारोंच्या घरात असताना ८५ नावे वगळण्यात आली.