परळी- कालरात्री देवीचा वैद्यनाथ देवल कमिटीने भाविकांच्या देणगीतून सुमारे ११ लाख रुपयांचा २२ किलो चांदीचा मुखवटा बनविला आहे. दरम्यान, कालरात्री देवी व नजीकची डोंगर तुकाई मंदिर व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. येथे सध्या गर्दी वाढली आहे.
परळी शहरापासून तीन कि.मी.अंतरावर चांदापूर शिवारात डोंगर माथ्यावर तुकाई देवीचे मंदिर आहे. शहरा लगत पूर्वेकडे कालरात्री देवीचे मंदिर आहे. दोन्ही मंदिरांची देखभाल वैद्यनाथ देवल कमिटीकडे आहे. नवरात्र उत्सवानिमित्त शहरासह परिसरातील भाविक येत असतात. डोंगर तुकाईला जाणारा भाविक १ दिवसाच्या नैसर्गिक सहलीवर जातो. दरम्यान, कालरात्री मंदिरातील घटी बसणाऱ्या भाविकांसाठी भोजन व्यवस्था केली आहे.
११ लाखांचा खर्च : भाविकांनी दिलेल्या दानातून २२ किलो चांदीपासून मुखवटा बनविला आहे. तो कोल्हापूर येथील कारागिरांनी बनविला आहे. त्यांना १ लाख ५७ हजार रुपये मजुरी देण्यात आली असून सुमारे अकरा लाख रुपये खर्च मुखवटा बनविण्यासाठी झाला असल्याची माहिती येथील वैद्यनाथ देवल कमिटीकडून देण्यात आली आहे.