आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंदीची झाडे तोडल्याचा गुन्हा; दावा केला स्वातंत्र्यलढ्याचा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी : महाराष्ट्र शासनाने मार्च २०१५ मध्ये बीड जिल्ह्यातील ७९, अहमदनगर ४ आणि उस्मानाबाद २ अशा एकूण ८५ प्रकरणांत भूमिगत स्वातंत्र्यसैनिक सन्मान निवृत्तिवेतन मंजूर केले. मात्र, तक्रारीनंतर विभागीय आयुक्तांकडून झालेल्या चौकशीत आष्टी तहसील कार्यालयातून प्रस्तावात दिलेले तिन्ही वॉरंट बनावट असल्याचा अहवाल शासनाकडे सादर झाला.
त्यामुळे ८५ स्वातंत्र्यसैनिकांना मार्च २०१५ ते मे २०१५ या कालावधीत निर्गमित केलेले आदेश रद्द करून ज्यांना निवृत्तिवेतन आणि निवृत्तिवेतनाची थकबाकी प्रदान करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांनी रक्कम वसूल करावी, असे आदेश १६ सप्टेंबर २०१६ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. सिंदीची झाडे ताेडल्याचा गुन्हा नोंदलेला असताना त्याचा स्वातंत्र्यलढ्याशी संबंध जाेडून शासनाचा निधी लाटण्याचा प्रकार अखेर उघड झाला.
भूमिगत स्वातंत्र्यसैनिक सन्मान निवृत्तिवेतन मंजूरप्रकरणी सखोल चौकशीनंतर जप्ती वॉरंट बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. भविष्यात अशी प्रकरणे उद्भवु नयेत या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई करण्यासाठी शासनाने हा कठोर निर्णय घेतल्याचे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यासन अधिकारी मंजूषा साळवी यांनी शासकीय पत्रात म्हटले आहे.

दहा- दहा लाख होणार वसूल : भूमिगत स्वातंत्र्यसैनिक निवृत्तिवेतन मंजूर प्रकरणातील आष्टी तालुक्यातील सुरुडी येथील नारायण हरी गर्जे यांना १८ मे १९८९ ते ३० एप्रिल २०१५ या कालावधीचे ९ लाख ९० हजार ७२८ रुपये आणि देवीनिमगाव येथील रहिवासी मोहनलाल श्रीकृष्ण क्षेत्रीय यांना ५ सप्टेंबर १९८८ ते ३० एप्रिल २०१५ या कालावधीचे ९ लाख ९३ हजार ८८४ रुपये अशी दोन प्रकरणे मंजूर झाली होती. या दोघांनीही निवृत्तिवेतन रक्कम उचलली आहे. त्यामुळे रक्कम वसुलीसाठी तहसीलदारांनी कारवाई सुरू केली आहे.

आष्टी तहसील कार्यालयातून प्रस्तावात दिलेले तिन्ही वॉरंट बनावट

या मुद्द्यांनीच फोडले बिंग

१. ८५ प्रकरणांमध्ये सादर झालेल्या माहितीच्या सखोल चौकशीतून गैरप्रकार उघड झाला. यात १३ स्वातंत्र्यसैनिकांपैकी ५ स्वातंत्र्यसैनिकांचा जन्म १९४८ नंतर झाल्याचे आणि ८ जणांचे वय १० वर्षांपेक्षाही कमी असल्याचे दिसून अाले.
२. तहसीलकडून दिलेल्या माहितीत (१४ आजूर १३५७ फसली, २७ बहेमान १३५७ फसली आणि ३ इस्फिन्दार १३५७ फसली) हे तीनही जप्ती वॉरंट बनावट दिसून आले. तहसील आणि त्या वेळी ज्या-ज्या कार्यालयांना वॉरंटच्या प्रती दिल्या होत्या. त्या कार्यालयांकडे वॉरंटच्या आवकबाबत नोंद नसणे आणि वॉरंटच्या प्रती उपलब्ध नसणे अशा बाबी समोर आल्या.
३. दाखल केलेल्या १४ आजूर १३५७ फसलीच्या उर्दू वॉरंटच्या मराठी अनुवादानुसार वॉरंटमध्ये तत्कालीन काँग्रेसच्या गुंडांविरुद्ध सिंदीची झाडे तोडल्याच्या आरोपावरून दंडात्मक कार्यवाही केल्याचे नमूद आहे. मात्र, या वॉरंटमध्ये स्वातंत्र्यलढ्याशी काही कृत्य केल्याबाबत आरोप नमूद नाहीत, या सर्व बाबी पाहता सादर वॉरंट बनावट असल्याचा अहवाल १८ जुलै २०१६ रोजी शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

मला रक्कम मिळालेली नाही
नारायण गर्जे, स्वा.सै. सुरुडी

आम्हाला स्वातंत्र्यसैनिक पेन्शन मंजूर झाली आणि लागलीच रद्द झाल्याचे समजले. त्यानंतर रक्कम हातात पडायच्या अगोदरच वकील साहेबांनी अपील करण्यासाठी व पैसे काढण्यासाठी सह्या घेतल्या आहेत. माझ्या हातात काहीही पैसे मिळाले नाहीत.

आदेशानुसार कारवाई सुरू
रामेश्वर गोरे, तहसीलदार आष्टी

स्वातंत्र्यसैनिक निवृत्तिवेतन नवीन मंजूर प्रकरणातील तक्रारीनंतर सखोल चौकशी झाली. या चौकशीत जप्ती वाॅरंट बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत मंजुरी आदेश रद्द झाला. त्यामुळे तालुक्यातील संबंधित दाेघांना अदा केलेली रक्कम वसुलीसाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कारवाई सुरू केली आहे.
बातम्या आणखी आहेत...