आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिग्गज नेत्यांच्या वाटाघाटीचे प्रयत्न ठरले फोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताकेंद्रात नवख्यांचा शिरकावच नको, या उद्देशाने गेल्या महिनाभरापासून जिल्ह्याच्या दिग्गज नेत्यांनी सर्व भेद दूर करीत एकत्र येऊन बाजार समितीची निवडणूक वाटाघाटीद्वारे बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना सपशेल अपयश आले आहे. बिनविरोध तर दूरच, उलट प्रस्थापितांच्या या कारस्थानाला छेद देण्यासाठी आता तीन पॅनल निवडणूक रिंगणात दाखल झाल्याने या वेळची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जागांसाठी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत गुरुवारपर्यंत दिग्गजांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही. ९४ उमेदवारांनी माघार घेतली असली तरी ६७ उमेदवार रिंगणात आहेत. तीन पॅनलच्या माध्यमातून हे उमेदवार रिंगणात राहतील. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री सुरेश वरपुडकर, शिवसेनेचे खा. संजय जाधव, आ. डॉ. राहुल पाटील या तिघांनी एकत्र येत काँग्रेस शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरुवातीपासूनच सुरू केले होते. परंतु वाटाघाटीत काही दिग्गज विद्यमान संचालकांना सामावून घेतल्यामुळे अन्य विरोधी गट एकत्र आल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढतच गेली.

या उमेदवारांना रिंगणाबाहेर काढण्याच्या दृष्टीने नेतेमंडळींनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊ शकले नाही. परिणामी रिंगणाबाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी विरोधी गटाच्या पॅनलचे उमेदवार रिंगणात तेही दोन गटांत असल्याने आता तीन पॅनलमध्ये ही निवडणूक होईल. काँग्रेस शिवसेनेने एकत्र येऊन तर राष्ट्रवादीचे बाजार समितीचे माजी सभापती विजय जामकर, अॅड. स्वराजसिंह परिहार, भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, शिवसेनेचे नेते कल्याणराव रेंगे यांनीही अखेरच्या दिवसांत काही समीकरणे जुळवत एकत्र येऊन या दिग्गजांना आव्हान उभे करण्यासाठी पॅनलची जुळवाजुळव केली. काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने शिवसेनेशी साठगाठ बांधली असली तरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंजाबराव देशमुख यांनीही सर्व जागांवर उमेदवार उभे करीत परिवर्तन पॅनलची घोषणा केल्याने हे तिसरा पॅनलही रिंगणात आहे.

नवे पर्व, गरीब सर्व...
बाजार समितीची निवडणूक ही अर्थाचीच (पैशांची) असते याचा प्रत्यय राजकीय मंडळी, कार्यकर्त्यांना असतोच. त्यामुळे ग्रामीण शहरी राजकारणाचे सत्ताकेंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाजार समितीवर दिग्गज त्यांचीच मुले, आप्त यांचा भरणा असतो. या परंपरेला फाटा देण्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंजाबराव देशमुख यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन ‘नवे पर्व, गरीब सर्व....’ची घोषणा देत परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून रिंगणात उडी घेतली.
बातम्या आणखी आहेत...