आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा महिन्यांत तब्बल 16 वेळा गूढ आवाज!आपत्ती व्यवस्थापन वर्तवतय केवळ अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूम - शहरात गेल्या सहा महिन्यांपासून तब्बल १६ वेळा भूगर्भातून गूढ आवाज झाल्याने शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी(दि. ४) एका तासात दोन वेळा गूढ आवाज झाल्याने नागरिक अधिकच भयभीत झाले आहेत. अशा प्रकारचा आवाज सकाळी किंवा दुपारीच होतो. मात्र, आवाजाबाबत प्रशासन अनभिज्ञ असून, भूजल सर्वेक्षण विभागास पत्रव्यवहार केल्याचे प्रशासनाकडून  सांगण्यात येत आहे.  

जिल्ह्यात गूढ आवाजांची मालिका कायम आहे. विशेषत: भूम, वाशी तालुक्यात वारंवार गूढ आवाज होत आहेत. या गूढ आवाजांचे प्रशासनालाही रहस्य आहे. भूगर्भातून अचानक मोठे आवाज होतात, प्रशासनाला त्याबाबत नागरिकांकडून विचारणाही होते, मात्र, आवाजाचे नेमके कारण प्रशासनही सांगू शकत नाही. प्रशासनाकडे आपत्ती व्यवस्थापनाचा स्वतंत्र विभाग आहे. मात्र, या विभागाकडून केवळ वेगवेगळ्या भागात प्रात्यक्षिक घेण्यापलीकडे फारसे काम होत नाही. प्रत्यक्ष आपत्तीच्या काळात या विभागाचे अस्तित्व दिसतच नाही. 

गूढ आवाजाबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या ‘दोन वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या भूगर्भातून येणाऱ्या आवाजासंदर्भात माहिती घेण्यासाठी नागपूर येथील भूवैज्ञानिक पथक जिल्ह्याचा सर्व्हे करून गेले होते व पाणी पातळी कमी जास्त प्रमाणात होऊन गॅस निर्माण होतो किंवा सुपर सोनिक नावाचे विमान आकाशातून जात असताना देखील असा आवाज  येत असल्याचा अहवाल दिला अाहे.’ मात्र, नेमका दोन्हीपैकी आवाज कशाचा हे संबंधित दिवशी प्रशासनाकडूनच जनतेला कळविणे आवश्यक आहे. जिल्हा भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. ३० सप्टेंबर १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपाची पुन्हा-पुन्हा आठवण येते, अशावेळी गूढ आवाजाच्या रहस्यामुळे जिल्हावासियांच्या मनात भीतीचे काहूर उठते.  होणाऱ्या गूढ आवाजामुळे नागरिक उलट सुलट चर्चा करत आहेत. या सर्व प्रकाराबाबत आपत्ती व्यवस्थापन अनभिज्ञ असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नागपूरहून पथक मागवणार
अशा प्रकारचे आवाज पाणी पातळीत कमी जास्त प्रमाणात होणाऱ्या वाढीमुळे होत असतात. मात्र याचा कोणताही धोका निर्माण होत नाही. मात्र भूम शहरातील अशा प्रकारच्या गूढ आवाजाबाबत अद्यापपर्यंत भूजल सर्वेक्षण विभागास कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. माहिती प्राप्त झाल्यास नागपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधून पथक मागवून  शहानिशा करू. 
- पी. एस. पोळ, प्रभारी वरिष्ठ भूवैज्ञानिक ,भूजल सर्वेक्षण विभाग,उस्मानाबाद. 
बातम्या आणखी आहेत...